Join us

खड्डेच खडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 4:06 AM

मुंबई : कुर्ला पश्चिम येथील मगन नथुराम मार्गाची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पडलेल्या पावसामुळे यात आणखी ...

मुंबई : कुर्ला पश्चिम येथील मगन नथुराम मार्गाची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पडलेल्या पावसामुळे यात आणखी भर पडली असून, मोठे खड्डे पडल्याने वाहनचालक आणि पादचारी यांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

वाहतूककोंडी कायम

मुंबई : मुंबई आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या लाल बहादूर मार्गावर सायनपासून कुर्ला कमानीपर्यंत फुटपाथलगत मोठ्या प्रमाणावर अनधिकृतरीत्या वाहने उभी केली जातात. परिणामी रस्ता आणखी अरुंद होतो. त्यात पाऊस आणि खड्ड्यांमुळे अडचणी आणखी वाढत आहेत. त्यामुळे येथे अनधिकृतरीत्या पार्क करण्यात आलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

म्हाडाकडून मदत

मुंबई : म्हाडातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्या मेमधील एक / दोन दिवसांच्या वेतन कपातीच्या माध्यमातून अंशतः जमा झालेल्या ३१ लाख ५० हजार रुपयांचा धनादेश कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी सुपुर्द करण्यात आला.

संशोधन अधिछात्रवृत्ती

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती २०१९ व २०२० साठी प्रतिवर्ष २०० विद्यार्थ्यांची निवड करण्यात येत आहे. अधिक विस्तृत माहितीसाठी बार्टीच्या संकेतस्थळावर भेट द्यावी, अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांनी दिली आहे.

जीर्णोद्धार सुरू

मुंबई : कुर्ला येथील सुंदरबाग परिसरातील देवस्थान श्री संतोषी माता मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम सुरू असून दुसऱ्या माळ्याच्या स्लॅबच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. मंजू सुनील कुमार गेलडा जैन यांनी या कामाचा संकल्प घेतला असून, या वेळी गेलडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनील कुमार गेलडा जैन आणि माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली उपस्थित होते.