मुंबई : युती सरकारमध्ये मंत्रिपदावरून पायउतार झाल्यानंतरही भाजपा नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या विशेष सुरक्षेवर शासनाकडून दिवसाला ४२ हजार ६४४ रुपयांपर्यंत खर्च होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे.जळगावच्या पोलीस अधीक्षकांनी याबाबत गोपनीयतेचे कारण देत माहिती अधिकारात कोणत्याही प्रकारची माहिती देण्यास नकार दिला. परिणामी, विशेष सुरक्षा व्यवस्था वैयक्तिकरीत्या हवी असल्यास किती रुपये लागतील? या प्रश्नावर मिळालेल्या उत्तरावरून खडसेंवर होणाऱ्या खर्चाचा अंदाज बांधल्याचे दमानिया यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.दमानिया म्हणाल्या की, गेल्या दीड वर्षापासून खडसे शासनाच्या कोणत्याही मंत्रिपदावर नाहीत. पण आजही त्यांना विशेष सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात येत आहे. त्यासाठी शासन सामान्य माणसांचा लाखो रुपयांचा निधी खर्च करत आहे. सध्या खडसेंना वाय प्लस सुरक्षा व्यवस्था पुरविली जात आहे. त्यात त्यांच्या सुरक्षेसाठी एक अंगरक्षक, एक हवालदार,३ पोलीस शिपाई, डिझेलसह एक गाडी व चालक, विशेष संरक्षण पथकाचे दोन कर्मचारी, गाडी व चालक यांचा खर्च शासन करत आहे, असेही दमानिया यांनी निदर्शनास आणून दिले.खडसे यांच्या सुरक्षेसाठी करण्यात येणारा हा खर्च अवास्तव असून या खर्चासाठी शासन इतर व्यक्तींकडून दिवसाला ४२ हजार ६४४ रुपये आकारते, असे दमानिया यांनी सांगितले. त्यामुळे गेल्या २० महिन्यांत खडसेंच्या विशेष सुरक्षेसाठी शासनाने तब्बल १२ लाख ७९ हजार ३२० रुपये खर्च केले, असा आरोपही दमानिया यांनी केला आहे.>फक्त मीच दिसतोंसामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची समाजाला गरज आहे. त्यांना शारीरिक व्याधीने ग्रासले आहे, त्यातून त्या लवकर बºया व्हाव्यात, या शुभेच्छा. राहिला प्रश्न माझ्या सुरक्षा व्यवस्थेचा, तर त्याचे उत्तर सरकार देईल. याहून अधिक महत्त्वाचे प्रश्न राज्यात आहेत. मात्र सुपारी घेतल्याप्रमाणे त्यांना फक्त मीच दिसत आहे.- एकनाथ खडसे, माजी मंत्री
खडसेंच्या सुरक्षेवर दिवसाला ४२ हजार रुपयांचा खर्च, अंजली दमानियांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 4:59 AM