खडसेंच्या जावयाला १९ जुलैपर्यंत ईडी कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:06 AM2021-07-16T04:06:37+5:302021-07-16T04:06:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी याला सक्तवसुली संचालनालयाने पुणे येथील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी याला सक्तवसुली संचालनालयाने पुणे येथील जमीन घोटाळा आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात गेल्या आठवड्यात अटक केली होती. गुरुवारी विशेष न्यायालयाने गिरीश याच्या ईडी कोठडीत १९ जुलैपर्यंत वाढ केली.
गुरुवारी चौधरी याची कोठडी संपल्याने त्याला विशेष पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणाचा खोलवर तपास करण्यासाठी ईडीने चौधरी याच्या ईडी कोठडीत वाढ करण्याची विनंती न्यायालयाला केली. न्यायालयाने ती विनंती मान्य करीत चौधरी याची ईडी कोठडी १९ जुलैपर्यंत वाढवली.
ईडीच्या म्हणण्यानुसार, चौधरी आणि खडसे यांनी पुण्यातील भोसरी येथील भूखंड ३.७५ कोटी रुपयांना खरेदी केला. वास्तविक, त्याची बाजार किंमत ३१.०१ कोटी रुपये होती. त्या वेळी खडसे हे महसूलमंत्री होते. त्यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करून सरकारचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवला.
याबाबत खडसे यांची ईडीने सहा तास चौकशी केली होती. त्यानंतर ईडीने गिरीश चौधरी याची गेल्या मंगळवारी सहा तास चौकशी केली आणि त्यानंतर बुधवारी पहाटे अटक केली.