खैरानीचा राजा मंडळाने दिला रशियन महिलेस आधार; रशियन दूतावासाने मानले आभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 04:19 AM2020-08-27T04:19:34+5:302020-08-27T04:21:05+5:30
महिला मायदेशी परतणार, मंडळाचे अध्यक्ष प्रशांत मौर्या यांनी या महिलेस मंडळाच्या कार्यालयात आणले. या महिलेस इंग्रजी समजत नसल्याने तिच्याशी संवाद साधणे कठीण होत होते.
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मरिना बियुकोवा (३५) ही रशियन महिला मुंबईत अडकली होती. मागील चार ते पाच महिने मुंबईत अडकून पडलेली मरिना ही एका मानसिक आजाराने ग्रस्त असल्याने ती अंधेरी येथील फूटपाथवर बेवारस स्थितीत राहात होती. ती नशेत असल्याचा समज झाल्याने कोणीच तिच्या मदतीला पुढे येत नव्हते. ही महिला साकीनाका येथील खैरानीचा राजा मंडळाच्या काही पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आली.
मंडळाचे अध्यक्ष प्रशांत मौर्या यांनी या महिलेस मंडळाच्या कार्यालयात आणले. या महिलेस इंग्रजी समजत नसल्याने तिच्याशी संवाद साधणे कठीण होत होते. यावेळी मंडळाच्या काही महिला कार्यकर्त्यांनी मरिना हिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. तिची बॅग तपासली असता त्या बॅगेत डॉक्टरांनी दिलेले प्रीस्क्रिप्शन आढळले. ते प्रीस्क्रिप्शन रशियन भाषेत असल्याने रशियन भाषेतील जाणकारांची मदत घेण्यात आली.
काही दिवसातच रशियन वाणिज्य दूतावास व पवई येथील एका रशियन महिलेने मंडळाशी संपर्क साधला. यावेळी डॉक्टरांकडून मरिना यांची सर्व वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या महिलेस सोबत घेऊन जाणे शक्य नसल्याने तिच्या राहण्याची सोय करण्यात यावी अशी विनंती रशियन वाणिज्य दूतावासाने मंडळाकडे केली. या घटनेबाबत मरिनाच्या मित्रपरिवाराला माहिती मिळाल्यानंतर तिच्या मित्रांनी निधी गोळा करून तिला आपल्या मायदेशी परतण्याची व्यवस्था केली आहे. काही दिवसातच मरिना गोवा येथून रशियाला रवाना होणार आहे. मंडळाने केलेल्या कामगिरीबद्दल रशियन वाणिज्य दूतावासाने मंडळाचे आभार मानले आहेत.
अतिथी देवो भव: असे आपल्याला आपली भारतीय संस्कृती शिकविते. हे आम्ही सिद्ध करून दाखविल्याने आम्हाला आनंद होत आहे.
- प्रशांत मौर्या, अध्यक्ष, खैरानीचा राजा मंडळ