मुंबई : उजनी धरणातील पाणीवाटपावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर तातडीने खडकवासला प्रकल्पाचे स्थिरीकरण करावे. तसेच टाटा वीज प्रकल्पात वापरले जाणारे पाणी परत भीमा खोऱ्यात आणण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी भाजपचे विधान परिषदेतील आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.
पाण्यावर सर्वांचा समान हक्क आहे. भीमा खोऱ्यातील सर्व लाभधारक व पाणी वापरकर्त्यांना त्यांचे हक्काचे पाणी मिळायला हवे. कोणत्या भागाला पाणी द्यावे किंवा देऊ नये या तांत्रिक बाबीत न पडता उजनी धरणावरील लाभधारक व वापरकर्त्यांवर अन्याय होऊ नये यासाठी मोहिते-पाटील यांनी खडकवासला प्रकल्प स्थिरीकरणाची मागणी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली आहे. उजनी धरणातून इंदापूर तालुक्यातील शेटफळगढे येथे नवा मुठा उजवा कालव्यामध्ये पाणी टाकून खडकवासला प्रकल्पाचे स्थिरीकरण करण्यासाठी ५ टीएमसी पाणी उचलण्यास तत्त्वत: मान्यता देण्यात आली होती. मात्र, उजनी धरणावर अवलंबून असलेल्या लाभक्षेत्र व वापरकर्त्यावर याचा काय परिणाम होईल याबाबत जलसंपदा विभागाने अभ्यास केला नाही. या योजनेसाठी पाणीसाठा पुण्याजवळ करून तेथेच प्रक्रिया करून खडकवासला कॅनॉलमध्ये सोडून सिंचनाला दिल्यास खडकवासला कालव्याचे स्थिरीकरण होण्यास मदत होईल. त्याचबरोबर उजनीत येणारे दूषित पाणी बंद होऊन उजनी जलाशय प्रदूषणमुक्त होईल, असे मोहिते-पाटील यांनी पत्रात म्हटले आहे.
शेती आणि उद्योगांवर परिणाम होणार नाही, तसेच सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, उस्मानाबाद व बीड या सहा जिल्ह्यांतील सिंचनासाठी पाणी मिळावे यासाठी सरकारने २०१४ साली कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेस मान्यता दिली होती. कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेचे काम तत्काळ हाती घेण्याचीही मागणी मोहिते-पाटील यांनी केली आहे, तसेच पुणे जिल्ह्यातील टाटांच्या वीजनिर्मिती प्रकल्पासाठी दिलेले ४७ टीएमसी पाणी वापरानंतर घाटातून पश्चिमेकडे वळविल्यामुळे भीमा खोऱ्यात येत नाही. त्यामुळे भीमा खोऱ्यातील लाभधारक शेतकरी हक्काच्या पाण्यापासून वंचित राहत आहेत. हे पाणी भीमा खोऱ्यात आणण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणीही त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.