लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई पोलीस त्यांच्या हटके ट्विटमुळे नेहमीच चर्चेत असतात. गेल्या महिन्यात मुंबई पोलिसांच्या बँड पथकाने जेम्स बॉण्ड थीमवर धरलेल्या तालाने सर्वांनाच आश्यर्चचकित केले. त्यापाठोपाठ विविध थीमवर खाकी स्टुडिओतील बँड पथक सर्वांचीच मने जिंकताना दिसत आहेत.
ब्रिटिश काळात किंग जॉर्जच्या रौप्य महोत्सवी वर्षानंतर मुंबई पोलीस बँड पथकाची स्थापना करण्यात आली. पुढे त्यांच्या कलेची दखल घेत १८ डिसेंबर हा पोलीस बँड डे म्हणून घोषित करण्यात आला. ब्रिटिश काळानानंतर मुंबई पोलिसांनी १९५९ पासून स्वत्रंतपणे हे बँड सुरू ठेवले.
गेल्या महिन्यात हॉलीवूडमधील सुप्रसिद्ध गुप्तहेर जेम्स बाँड याच्याशी संबंधित एक म्युझिक पीस या बँडने वाजवला. या व्हिडीओमध्ये पोलीस दलाचा बँड खाकी वर्दीमध्ये वादन करत आहे. या व्हिडीओला ‘जेम्स बाँड थीम बाय खाकी स्टुडिओ’ असे नाव देण्यात आले होते. मुंबई पोलिसांनी ट्विट केलेल्या या पोस्टमध्ये ‘खाकी स्टुडिओ, मुंबई पोलीस बँड आपल्यासाठी सादर करत आहे, जेम्स बाँडची थीम कम्पोज करणाऱ्या माँटी नॉर्मन यांना श्रद्धांजली. पोलीस हवालदार जमीर शेख यांनी या बँडवर ही भूमिका साकारली आहे,’ हे नमूद करण्यात आले आहे.
नॉर्मन यांनी पहिल्यांदा ही भूमिका जेम्स बाँडच्या १९६२ ला प्रदर्शित झालेल्या ‘डॉक्टर नो’ चित्रपटासाठी तयार केली होती. बँडने सिंगर माँटी नॉर्मनच्या जेम्स बाँड थीमला रिक्रिएट करून लोकांची मने जिंकली आहेत. त्याशिवाय मुंबई पोलीस दलातील या योद्ध्यांनी अभिनेता डॅनियल क्रेग याच्या आगामी ‘नो टाइम टू डाई’ या चित्रपटातील सीनही वापरण्यात आला आहे, त्यामुळे त्या वादनाची मजा आणखी वाढताना दिसली. ट्विटरबरोबर इन्स्टाग्रामवर या बँडचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर झाले.
खाकीतील स्टुडिओतून सोशल मीडियावरील ट्रेंड लक्षात घेऊन नुकताच ‘जगप्रसिद्ध चोरी’ दाखवण्यात आलेल्या मनी हाईस्टच्या पाचव्या सीजनचा पहिला भाग नेटफ्लिक्सवर रिलीज होताच मुंबई पोलिसांनी एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये मनी हाईस्टच्या बेला चाओ या प्रसिद्ध गाण्यावर इन्स्ट्रूमेंट वर्जन सादर केले आहे. मुंबई पोलिसांच्या या परफॉर्मन्सचे नेटकऱ्यांनी खूप कौतुक केले आहे. व्हिडीओ शेअर करताना ‘आम्ही कायमच ट्रेंड्स फॉलो करण्याचा प्रयत्न करतो’, असेही नमूद केले आहे.