खाकीतील याेद्ध्यामुळे रस्त्यावर तडफडणाऱ्या तरुणाला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:05 AM2021-05-23T04:05:18+5:302021-05-23T04:05:18+5:30

हातापायाला सापाचा चावा; ‘त्या’ २० मिनिटांचा थरार अन् नंतर भावासारखी सेवा लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : तौक्ते चक्रीवादळामुळे कोसळलेल्या ...

The khaki warrior saved the life of a young man who was suffering on the road | खाकीतील याेद्ध्यामुळे रस्त्यावर तडफडणाऱ्या तरुणाला जीवदान

खाकीतील याेद्ध्यामुळे रस्त्यावर तडफडणाऱ्या तरुणाला जीवदान

googlenewsNext

हातापायाला सापाचा चावा; ‘त्या’ २० मिनिटांचा थरार अन् नंतर भावासारखी सेवा

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : तौक्ते चक्रीवादळामुळे कोसळलेल्या एका झाडाआड दडून बसलेल्या सापावर किराणा माल घेऊन निघालेल्या तरुणाचा पाय पडला. पायाला सर्पदंश झाल्याचे लक्षात येताच तो घाबरला. सापाने पायाला वेटोळे मारले. त्याला काढत असताना पुन्हा हाताला चावा घेतला. वाचवा... वाचवा... म्हणून ताे जीवाच्या आकांताने ओरडत हाेता. दरम्यान, दुचाकीवरून घराकडे निघालेल्या पोलीस शिपायाने ताे आवाज ऐकला, घाबरलेला तरुण नजरेस पडताच त्याच्याकडे धाव घेतली. तत्काळ त्याला रुग्णालयात नेले. एवढ्यावरच न थांबता तो तरुण सुखरूप घरी पोहोचेपर्यंत त्याची भावासारखी सेवाही केली. जनसेवेचा वसा घेतलेल्या आणि माणसातील माणुसकीचे दर्शन घडवणाऱ्या या पाेलिसाचे नाव याेगेश खेडकर असे आहे.

मूळचे पुण्याचे रहिवासी असलेले खेडकर २०११ मध्ये पोलीस दलात दाखल झाले. २०१९ पासून ते गोराई पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. खेडकर सांगतात, आदल्या दिवशी रात्रपाळी करून घरी आलो. त्यानंतर १८ मे रोजी सुट्टी होती. मात्र कामानिमित्त बाहेर पडलो. काम उरकून घरी परतत असताना दुपारच्या सुमारास मनेरे गावाकडील रस्त्यावर पडलेल्या पाल्यापाचोळ्यात माेठ्याने ओरडत, तडफडणाऱ्या तरुणाकडे लक्ष गेले. तत्काळ त्याच्याकडे धाव घेतली. त्याच्या पायाला आणि हाताच्या बोटाला साप चावल्याचे समजले. लगेचच दाेरी शाेधली आणि विष शरीरात पसरू नये यासाठी ज्या ठिकाणी साप चावला होता, त्याच्या काही भाग वरती दोरीने घट्ट बांधून त्याला रुग्णालयात नेले.

एकीकडे तरुणाची तडफड सुरू होती तर दुसरीकडे रुग्णालयात सर्पदंशावरील औषध उपलब्ध नव्हते. ३ रुग्णालये फिरल्यानंतर २० मिनिटांनी चौथ्या रुग्णालयात औषध मिळाले. उपचार सुरू झाले. त्याचे नाव सुरेंद्र प्रताप असल्याचे समजले. वेळीच त्याच्यावर उपचार झाल्याने ताे वाचला, याचे लाखमाेलाचे समाधान मिळाले, असे खेडकर यांनी सांगितले.

* रात्री घरचा डबा

सुरेंद्र उपचारांना प्रतिसाद देत असून जीवाचा धाेका टळला आहे, हे समजल्यानंतर खेडकर घरी गेले. मात्र, रात्री त्याच्यासाठी घरून जेवणाचा डबा घेऊन रुग्णालयात गेले. खाकीतील या भावाने आधी प्राण वाचवले नंतर जेवण आणले हे पाहून सुरेंद्रही भावुक झाला.

* मी फक्त माझे कर्तव्य बजावले...

योगेश खेडकर सांगतात, सुरेंद्रला लवकरात लवकर औषधोपचार मिळावेत म्हणून माझी धडपड सुरू होती. आपल्यामुळे कुणाचे तरी प्राण वाचल्यामुळे मलाही वेगळाच आनंद मिळाला. मी फक्त माझे कर्तव्य बजावले.

.............................................

Web Title: The khaki warrior saved the life of a young man who was suffering on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.