कर्तव्याबरोबर कला जपण्याचीही धडपड
मनीषा म्हात्रे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कर्तव्याबरोबर स्वतःची कला जोपासत खाकीतील खऱ्या हिरोने हिंदी चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे. कोरोनाच्या काळात कर्तव्य, कुटुंबाची जबाबदारी पेलून, खेरवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक संजीव महादेव लांडगे मिळालेल्या वेळेत आपली कला जपण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत. अंगी जिद्द, चिकाटी असल्यास, कारणांना जागा मिळत नाही आणि आपण काहीही करू शकतो असे त्यांनी सांगितले.
सांगलीचे रहिवासी असलेले संजीव महादेव लांडगे माहीम पोलीस वसाहतीत पत्नी आणि दोन मुलांसोबत राहतात. कोरोनामुळे दोन्ही मुलांना त्यांनी गावी ठेवले आहे. शाळा, महाविद्यालयापासून अभिनय, गाण्याची आवड असलेले संजीव २००४ मध्ये मुंबई पोलीस दलात दाखल झाले. सुरुवातीच्या काळात कर्तव्य बजावताना कला मागे सुटत गेली. मात्र त्यांनीही हार न मानता, कर्तव्यानंतर मिळालेल्या वेळेत आपला छंद जोपासण्यास सुरुवात केली. घरी आल्यानंतर किंवा सुट्टीच्या दिवशी गाणी लिहायची आणि ती गुणगुणत राहायची हा जणू त्यांचा छंदच बनला. आणि यातूनच पुन्हा एकदा नवीन उमेद मिळाल्याचे ते सांगतात. यातच, गाणी तयार करून व्हिडीओद्वारे व्हायरलही करू लागले. २०१२ मध्ये एका मराठी चित्रपटात संधी मिळाली, कामही केले, मात्र काही कारणास्तव चित्रपट प्रदर्शित झाला नाही.
मात्र त्यांनी न खचता प्रवास सुरूच ठेवला. कोरोनाच्या काळातही कोरोना को हराना है या शॉर्टफिल्मसह, गो कोरोनासारख्या गाण्यातून त्यांनी लोकांमध्ये सकारात्मकता आणण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांनी पोलिसांसाठी गायलेले ‘वंदे मातरम्’ हे गाणेही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. त्यांनी आता हिंदी चित्रपट क्षेत्रात उडी घेतली आहे. ‘कॅश ऑन डिलिव्हरी’ या चित्रपटातून ते बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहेत.
शूटिंगदरम्यान कामाकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून कर्तव्यानंतर मिळालेल्या वेळेत त्यांचे शूटिंग सुरू होते. संजीव सांगतात, सध्या सगळीकडेच कोरोनामुळे नकारात्मक वातावरण आहे. हा काळ लवकरच जाणार आहे. मात्र हातात असलेल्या वेळेचा सदुपयोग करणे गरजेचे आहे. नागरिकांनी सकारात्मक राहून आलेल्या संकटाशी दोन हात करायचे आहे. तुम्ही फक्त घरी राहून शासनाच्या आदेशांचे पालन करा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
* कोरोनाच्या काळात पत्नीलाही दिला धीर...
मार्चअखेर त्यांच्या घरातही कोरोनाने शिरकाव केला. यात पत्नी काेराेना पॉझिटिव्ह आली, तर त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. आपल्यामुळेच पत्नीला बाधा झाल्याच्या विचाराने काही क्षणासाठी तेही स्तब्ध झाले. पत्नीला कोविड सेंटरमध्ये दाखल करत ते घरी क्वॉरंटाइन होते. संजीव सांगतात, हा काळ फार आव्हानात्मक होता. पत्नी एकटी असल्यामुळे घाबरली हाेती. सकारात्मक विचार, त्याचबरोबर रोज व्हिडीओ कॉलिंगद्वारे पॉझिटिव्ह संवाद ठेवून आम्ही यातून बाहेर पडलो. या काळात नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असेही त्यांनी नमूद केले.
* ५० हून अधिक गाणी तयार
संजीव यांनी ५० हून अधिक गाणी तयार करून ठेवली आहेत. ते सध्या त्यासाठी चांगल्या संधीची वाट पाहत आहेत.
..................................