‘खळ्ळखट्याक्’ने सेवा थंडावली; ‘ओला-उबर’ ठप्प, मुंबईकरांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 06:09 AM2018-03-20T06:09:24+5:302018-03-20T06:09:24+5:30
शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेतृत्वाखाली ओला-उबरच्या चालक-मालकांनी पुकारलेला संप यशस्वी झाल्याचे चित्र संपूर्ण मुंबईत दिसून आले. तथापि, आठवड्याचा पहिलाच दिवस संपात गेल्याने मुंबईकरांचे मात्र हाल झाले.
मुंबई : शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेतृत्वाखाली ओला-उबरच्या चालक-मालकांनी पुकारलेला संप यशस्वी झाल्याचे चित्र संपूर्ण मुंबईत दिसून आले. तथापि, आठवड्याचा पहिलाच दिवस संपात गेल्याने मुंबईकरांचे मात्र हाल झाले.
संप यशस्वी करण्यासाठी ‘खळ्ळखट्याक्’चा वापर झाल्याने त्याची रस्त्यावर उतरलेल्या मोजक्या चालकांनी धास्ती घेतली होती. या देशव्यापी संपाला अनेक संघटनांनी पाठिंबा दिल्याने संपाची व्याप्ती वाढली. संपकऱ्यांच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी ‘ओला’ने दोन दिवसांची मुदत मागून घेतली आहे. तर ‘उबर’ने मुंबईतील कार्यालय बंद करून शिष्टमंडळाची भेट घेणे टाळल्याने संपकरी चांगलेच संतापले होते. ओलाच्या संभाव्य बैठकीत निर्णय घेणाºया अधिका-यांची उपस्थिती असावी; तर उबर कंपनीबाबत चिरागनगर पोलिसांनी मध्यस्थी करावी, अशी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेने घेतली आहे. संप सुरूच राहिल्याने मुंबईकरांच्या त्रासात वाढ होणार आहे.
मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या संपाचा सकाळी परिणाम जाणवला. सवयीप्रमाणे नागरिकांनी टॅक्सी बुक करण्यासाठी आॅनलाइन येताच टॅक्सी उपलब्ध नसल्याचे दिसून आले. ज्यांना संपाची माहिती नव्हती; त्यांना प्रवासाचे नियोजन करणे त्रासदायक ठरले. प्रवाशांना नाइलाजास्तव बेस्ट, रेल्वे आणि मेट्रो या सेवांचा आधार घ्यावा लागला. संपाविरुद्ध ओला-उबरने स्वमालकीची वाहने रस्त्यावर उतरविल्याने महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या पदाधिकाºयांकडून या वाहनांवर हल्ले करण्यात आले. वाहतूक सेनेचे सरचिटणीस नितीन नांदगावकर यांना नेहरूनगर पोलिसांनी तर ८ कार्यकर्त्यांना अंधेरी पोलिसांनी अटक केली.
तूर्तास संप सुरूच राहाणार
या संपाविरुद्ध चालक-मालकांनी साथ दिली आहे. ‘अॅप बेस टॅक्सी’ कंपनीच्या मनमानी कारभाराला लगाम घालण्यासाठी बहुतांश वाहतूक संघटना संपात सहभागी झाल्या आहेत. मागण्या पूर्ण न झाल्यामुळे तूर्तास संप सुरूच राहणार असल्याचे वाहतूक सेनेने स्पष्ट केले.
रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास
विकासकामे आणि वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे मुंबईतील रस्त्यांवर वाहतूककोंडी होती. मात्र संपामुळे सुमारे ३० हजारांहून अधिक वाहने रस्त्यावर न उतरल्याने रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला.
परिणामी, वाहतूककोंडीसाठी ओळखल्या जाणाºया पश्चिम द्रुतगती महामार्ग, पूर्व द्रुतगती महामार्ग, टोल नाक्यांवर ट्रॅफिक जामपासून मुंबईकरांची सुटका झाली. मात्र यामुळे पुन्हा एकदा ट्रॅफिक जामच्या कायमस्वरूपी सुटकेसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम
करण्याची गरज असल्याचे दिसून आले.