‘खांदेरी’ पाणबुडीच्या सागरी चाचण्या सुरू"
By admin | Published: June 3, 2017 04:41 AM2017-06-03T04:41:36+5:302017-06-03T04:41:36+5:30
माझगाव गोदीत बांधण्यात आलेली देशी बनावटीच्या ‘खंदेरी’ या पाणबुडीच्या सागरी चाचण्यांना गुरुवारी सुरुवात झाली. मुंबई बंदरातून
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : माझगाव गोदीत बांधण्यात आलेली देशी बनावटीच्या ‘खंदेरी’ या पाणबुडीच्या सागरी चाचण्यांना गुरुवारी सुरुवात झाली. मुंबई बंदरातून खोल समुद्रात रवाना झालेल्या या पाणबुडीस आगामी काळात कठोर सागरी चाचण्यांना सामोरे जावे लागणार आहे. त्यानंतरच या पाणबुडीचा नौदलातील समावेशाचा मार्ग मोकळा होणार आहे.
फ्रान्सच्या सहकार्याने माझगाव गोदीत सहा स्कॉर्पियन पाणबुड्या बांधणीचे काम सुरू आहे. यातील खांदेरी या दुसऱ्या स्वदेशी पाणबुडीचे या वर्षी १२ जानेवारी रोजी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत जलावतरण झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या खांदेरी या जलदुर्गावरून या पाणबुडीला खांदेरी हे नाव देण्यात आले. स्कॉर्पियन वर्गातील या पाणबुड्यांमध्ये उच्च दर्जाची स्टिल्थ प्रणाली वापरण्यात आली आहे. त्यामुळे शत्रुपक्षाला चकवा देत, सागरी मोहिमा फत्ते करण्याची क्षमता यात आहे. खोल समुद्रातून, तसेच समुद्रावरून टॉरपॅडो, क्षेपणास्त्रे, युद्धनौकाविरोधी क्षेपणास्त्रे डागण्याची क्षमता या पाणबुड्यांमध्ये आहे. सर्व प्रकारच्या सागरी मोहिमांमध्ये उपयोगी पडतील, अशी अत्याधुनिक प्रणाली या पाणबुड्यांमध्ये बसविण्यात आली आहे. समुद्रात सुरुंग पेरणे, माहिती गोळा करणे, टेहळणीपासून युद्धनौका व पाणबुडीविरोधी मोहिमा हाताळण्याची क्षमता असणाऱ्या या पाणबुड्यांमुळे भारतीय नौदलाची ताकद वाढणार आहे.
वर्षभराच्या कठोर परिक्षणानंतर स्कॉर्पियन वर्गातील पहिली पाणबुडी कलवरी नौदलातील समावेशासाठी सज्ज झाली आहे. या वर्षी आॅगस्ट महिन्यापर्यंत ही पाणबुडी नौदलात दाखल होण्याची शक्यता आहे.