खारमध्ये ३८ लाखांचा विदेशी दारूसाठा जप्त
By admin | Published: September 8, 2016 06:09 AM2016-09-08T06:09:55+5:302016-09-08T06:09:55+5:30
विदेशातून आलेल्या पर्यटकांकडून स्वस्त दरात दारू घेऊन, हीच दारू गुजरातमध्ये जास्त भावाने विकणाऱ्या एका टोळीला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज अटक केली.
मुंबई: विदेशातून आलेल्या पर्यटकांकडून स्वस्त दरात दारू घेऊन, हीच दारू गुजरातमध्ये जास्त भावाने विकणाऱ्या एका टोळीला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज अटक केली. या आरोपींकडून एक कारसह तब्बल ३८ लाखांची दारू हस्तगत करण्यात आली आहे.
मुंबईतून टुर्स कंपन्यांच्या माध्यमातून पर्यटक परदेशी फिरण्यासाठी जात असतात. विदेशात दारू स्वस्त असल्याने आरोपी पर्यटकांच्या माध्यमातून दारूची तस्करी करत होते. चुनाभट्टीतील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना ही माहिती मिळताच सतत पाच दिवस ते यावर लक्ष ठेऊन होते. खारमधील एका घरात हा सर्व माल जमा केला जात असल्याची खबर मिळाल्यावर, अधिकाऱ्यांनी बुधवारी पहाटे छापा टाकला. या वेळी ललित पंजाबी, पीयूष ठक्कर आणि नरेश पटेल यांना ताब्यात घेतले. या घराची झडती घेतली असता, घरामध्ये दहा ते बारा बॅगा आढळून आल्या. याच बॅगांमध्येही विविध कंपन्यांची विदेशी दारू आढळून आली. हा सर्व माल पॅकिंग करून गुजरातला पाठवण्यात येणार होता. त्या आगोदरच राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी या ठिकाणी छापा टाकला. भरारी पथकातील निरीक्षक संजय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली किरण पवार, संजय सावंत, दीपक गवळी, कैलास नखवा, दीपक जाधव, राकेश जगताप आणि सुनीता सानप यांनी ही कारवाई केली. (प्रतिनिधी)