Join us

पैशांच्या आमिषाने वृद्धांची लूट; 'काळे-पवार' टोळीचा पर्दाफाश !

By गौरी टेंबकर | Updated: December 26, 2024 13:26 IST

४०० सीसीटीव्ही फुटेज तपासत खार पोलिसांची कामगिरी

मुंबई : शेठला मुलगा झाल्याचे सांगत ज्येष्ठ नागरिकांना पैसे, साडी, कपडे देण्याचा बहाणा करून अंगावरील सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या 'काळे-पवार' टोळक्याचा पर्दाफाश करण्यात खार पोलिसांना यश आले आहे. अर्जुन काळे (२४) आणि बालाजी पवार (२०) अशी आरोपींची नावे असून ते मूळचे परभणीतील रहिवासी आहेत. तब्बल ३५० ते ४०० सीसीटीव्ही फुटेज तपासून या सराईतांचा गाशा गुंडाळण्यात आला.

खार पोलिसांच्या हद्दीत राहणाऱ्या सलमा कुरेशी २७ नोव्हेंबर रोजी मासे खरेदी करण्यासाठी बाजारात निघाल्या होत्या. त्यावेळी एक अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ आला आणि त्याने 'आमच्या शेठला मुलगा झाल्याने तो वृद्धांना साडी पैसे वाटतो आहे, ते घेण्यासाठी माझ्याबरोबर चला,' असे हिंदीमध्ये सांगितले. एका गाडीमागे बसवून सलमा यांना 'तुम्ही तुमच्या अंगावरील दागिने पर्समध्ये ठेवा. कारण ते दागिने पाहिले तर शेठ पैसे देणार नाही,' असेही भामट्याने सांगितले. त्यानुसार सलमा यांनी सोन्याची चेन, कर्णफुले व साखळी असे जवळपास १ लाख ३१ हजार रुपयांचे दागिने स्वतःच्या पर्समध्ये काढून ठेवले. त्यानंतर ही पर्स आरोपींनी हातचलाखीने लंपास करत तेथून पळ काढला.

दोन्ही आरोपी रेकॉर्डवरचे 

खार पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींवर खार, वांद्रे, सायन, कुरार, दहिसर, दादर, वागळे इस्टेट, दिंडोशी, डोंगरी, मुंब्रा, कल्याण, वाकोला, एन. एम. जोशी, भिवंडी, हडपसर, मुलुंड, चतुःशृंगी आणि सिंहगड या पोलिस ठाण्यांमध्ये वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. ज्यात त्यांनी वृद्ध महिला, पुरुष यांना टार्गेट केल्याचे तपासात उघड झाले आहे.

रस्ते, रिक्षा, कपडेही बदलले... तरी सापडले ! 

खार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजीव धुमाळ आणि निरीक्षक (गुन्हे) वैभव काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक दत्ता कोकणे, सहायक फौजदार मनोज वैद्य, अंमलदार आनंद निकम, शिपाई, संजय सानप, अजित जाधव, महेश लहामगे, मारुती गळवे आणि अभिजीत कदम यांनी घटनास्थ- ळावरील ३५० ते ४०० कॅमेरे पडताळले.

यामध्ये आरोपींनी वारंवार जाण्याचे रस्ते, १० वेळा कपडे व रिक्षा बदलल्याचे आढळून आले. हे आरोपी पोलिसांना खार, बांद्रा, सांताक्रुझ, परिसरात येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. तेव्हा येथे सापळा रचून दोघांचा गाशा गुंडाळला.

टॅग्स :मुंबईगुन्हेगारीमुंबई पोलीस