Join us

खार सबवे कोसळल्याच्या अफवेने पश्चिम रेल्वेला ‘ब्रेक’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 6:29 AM

देशभरात फेक न्यूज सध्या चर्चेचा विषय आहे. अशाच फेक न्यूजचा फटका रविवारी पश्चिम रेल्वेला बसला.

मुंबई : देशभरात फेक न्यूज सध्या चर्चेचा विषय आहे. अशाच फेक न्यूजचा फटका रविवारी पश्चिम रेल्वेला बसला. खार-सांताक्रुझ दरम्यान सबवे कोसळल्याची माहिती रेल्वेला मिळाली. त्याच दरम्यान व्हॉट्सअ‍ॅपवर खार सबवेचा भाग कोसळल्याचे संदेशही व्हायरल झाले. रेल्वेच्या तपासाअंती ही केवळ अफवा असल्याचे निष्पन्न झाले. मात्र गोंधळात पश्चिम रेल्वेची वाहतूक तासभर खोळंबली होती.रविवारी दुपारी ४ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास अग्निशमन दलाला अनोळखी व्यक्तीचा फोन आला. खार सबवे कोसळल्याची माहिती देत त्याने कॉल कट केला. यानंतर त्वरित अग्निशमन दलाने संबंधित माहिती आपत्कालीन विभाग आणि पश्चिम रेल्वेला दिली. पश्चिम रेल्वेने सुरक्षिततेचा उपाय म्हणून लोकल वाहतूक त्वरित बंद केली.पश्चिम रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागाने त्वरित घटनास्थळी धाव घेत सबवेची पाहणी केली. पावणेसहा वाजण्याच्या सुमारास पश्चिम रेल्वे अधिकाऱ्यांनी खार सबवे वाहतुकीसाठी ‘ओके’ असल्याचे सांगितले. गोंधळानंतर अखेर ५ वाजून ४५ मिनिटांनी अप आणि डाऊन हार्बर मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली. तर ३० कि.मी. प्रतितास या वेगमर्यादेसह धिम्या मार्गावरील वाहतूक ५ वाजून ५२ मिनिटांनी सुरू झाली. तर ५ वाजून ५० मिनिटांनी अप आणि डाऊन जलद मार्गाची वाहतूक सुरू करण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली.दरम्यान, रविवार जम्बोब्लॉकमुळे लोकल फेºया विलंबाने धावत होत्या.

टॅग्स :लोकल