खारघरचे ग्रामविकास भवन उद्घाटनाच्या प्रतीक्षेत
By admin | Published: December 2, 2014 10:50 PM2014-12-02T22:50:04+5:302014-12-02T22:51:25+5:30
खारघरमधील ग्रामविकास भवनाचे काम अंतिम टप्प्यात आहे. ही सुसज्ज इमारत आता उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. पुढील वर्षाच्या मे महिन्यापूर्वी हे काम पूर्ण होईल
नवी मुंबई : खारघरमधील ग्रामविकास भवनाचे काम अंतिम टप्प्यात आहे. ही सुसज्ज इमारत आता उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. पुढील वर्षाच्या मे महिन्यापूर्वी हे काम पूर्ण होईल आणि त्यानंतरच उद्घाटनाबाबत निर्णय घेतला जाईल.
राज्य शासनाच्या निर्देशानुसार सिडकोने खारघर सेक्टर - २१ मध्ये २००७ साली ग्रामविकास भवनाच्या कामाला सुरुवात केली. दोन वर्षात हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र निधीच्या कमतरतेमुळे आणि इतर कारणांमुळे हे काम रेंगाळले. २०११ साली इमारत बांधून तयार झाली, मात्र सभागृह व अंतर्गत सजावटीच्या कामासाठी लागणारा निधी शासनाकडून उपलब्ध न झाल्याने भवनाचे काम रखडले. सिडकोने शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज्य विभागाकडे पत्र पाठवून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती, त्यानुसार शासनाने ६ कोटी रु पयांचा निधी उपलब्ध करून देण्याचे मान्य केले.
ग्रामविकास भवनामध्ये लोकनियुक्त सदस्यांना प्रशिक्षण देण्यासाठी ६४ खोल्यांची व्यवस्था, ६३० व्यक्ती बसू शकतील एवढ्या क्षमतेचे सभागृह तसेच २२० व्यक्तींसाठी स्वयंपाकगृह, भोजन कक्ष, बचत गटांसाठी ३४ दुकाने आणि कार्यालय व इतर सुविधा असणार आहेत. खारघरमधील सिडकोचे प्रशासक प्रदीप डहाके यांना ग्रामविकास भवनाच्या कामाबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, ग्रामविकास भवनाच्या इमारतीचे काम पूर्ण झाले असून अंतर्गत सजावटीचे काम सुरु आहे. निविदेप्रमाणे पुढील वर्षाच्या मे महिन्यापूर्वी हे काम पूर्ण होईल, त्यानंतरच उद्घाटनासंदर्भात निर्णय घेतला जाईल.
आघाडी शासनाच्या कालावधीत ग्रामविकास भवनाच्या कामाला मंजुरी मिळाली व कामाला सुरु वात देखील झाली, मात्र विविध अडथळ्यांमुळे या ग्रामविकास भवनाच्या कामाचा उद्घाटनाचा मुहूर्त टळला. नव्याने स्थापन झालेल्या भाजपा सरकारच्या हस्ते या भवनाचे उद्घाटन होणार हे मात्र निश्चित झाले आहे. (प्रतिनिधी)