पनवेल : खारघर टोल सुरूझाल्यापासून वाहतूक कोंडी नित्याचीच बाब झाली असून याचा सर्वाधिक फटका सकाळच्या वेळेत शाळेत जाणा-या विद्यार्थ्यांना बसत आहे. वाहतूक कोंडीमुळे स्कूल बसेस टोलनाक्यावर अडकून पडत असून यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास दररोजज उशीर होत आहे.खारघरवरून पनवेलला जाण्यासाठी पूर्वी आठ ते दहा मिनिटांचा कालावधी लागत होता. मात्र हेच अंतर गाठण्यासाठी वाहनांना सुमारे अर्धा तासापेक्षा जास्त कालावधी लागतो. यामुळे सकाळच्या वेळेतील स्कूल बसेस अर्धा ते एक तास उशीराने शाळेत पोहचत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांची गैरहजेरी लागण्याचे प्रकारही काही शाळांमध्ये घडले आहेत. स्कूल बसेसला सकाळच्या वेळेत कोंडीतून सुटका करण्यासाठी प्राधान्य देण्याची मागणी पालकांनी केली आहे. अनेक वाहने वाहतूक कोंडीतून वाचण्यासाठी थेट तळोजा लिंक रोडमार्फत खारघरमध्ये प्रवेश करण्यासाठी लाँग कट मार्गाचा वापर करीत आहेत तर अनेक जण पुरुषार्थ पेट्रोल पंपाजवळील रस्त्यावरून विरुध्द दिशेने मार्ग काढत आपला जीव धोक्यात टाकत आहेत. स्थानिक वाहनांना याठिकाणी टोल प्रशासनाने कोणत्याही प्रकारचा पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिला नसून स्थानिकांना देखील इतर वाहनांसारखा वाहतूक कोंडीचा फटका सहन करावा लागत आहे . सायन पनवेल टोलवेजकडून देखील वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न राबविण्यात येत आहेत . त्यासाठी कर्मचाऱ्यांच्या हाती डिवॉईस मशिन देवून प्रत्येक वाहनाजवळ जावून वाहनधारकांकडून टोल वसूल केला जात असल्याची माहिती सायन पनवेल टोलवेजचे जनसंपर्क अधिकारी उमेश सोनावणे यांनी दिली. (प्रतिनिधी)
खारघर टोल कोंडीचा विद्यार्थ्यांना फटका
By admin | Published: January 14, 2015 2:41 AM