मुंबई/पुणे : राज्यातील काही भाग वगळता इतर ठिकाणी पुरेसा पाऊसच न झाल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आहे. निम्मा पावसाळा संपत आला, तरी केवळ ५४ टक्के क्षेत्रावरच पेरण्या झाल्या आहेत. दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्यात चिंताजनक परिस्थिती असल्याने, मूग आणि उडदाच्या पेरणी क्षेत्रात घट होण्याची शक्यता आहे. कोकणात मात्र भात आणि नाचणी लावणीच्या कामांना वेग आला आहे.राज्यात खरीपाच्या एकूण १४९.७४ लाख हेक्टर क्षेत्रापैकी केवळ ८०.६१ लाख हेक्टर क्षेत्रावर म्हणजे साधारण ५४ टक्के पेरणी झाली आहे. लांबलेल्या पावसामुळे गेल्या वर्षीपेक्षा पेरणी आणि लागवडीच्या कामांची गती कमी आहे, अशी माहिती कृषी विभागाने बुधवारी दिली.राज्यात १२ जुलै अखेरीस सरासरी ३९२.२ मिलिमीटर पाऊस होतो. मात्र, या कालावधीत ३२४.६ (८५.६ टक्के) मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यातही धुळे, नंदुरबार, सोलापूर, बीड, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गडचिरोलीमधे सरासरीच्या ५० ते ७५ टक्केच पाऊस झाला आहे. ठाणे, पालघर, रायगड, अहमदनगर, पुणे, सातारा आणि सांगली जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. उर्वरित राज्यांत ७५ ते १०० टक्क्यांपर्यंत पावसाची नोंद झाली.राज्यात ऊस पीक वगळून खरिपाचे १४०.६९ लाख हेक्टर क्षेत्र असून, ८० लाख ३३ हजार हेक्टरवरील पेरणीची कामे उरकली आहेत. गेल्या वर्षी याच कालावधीत ८४ लाख ६० हजार हेक्टरवरील पेरणीची कामे झाली होती. औरंगाबाद आणि लातूर विभागातील मूग आणि उडीदपिकाला फटका बसण्याची दाट शक्यता आहे.>पेरणीची टक्केवारीभात १७, खरीप ज्वारी २६, बाजरी ३०, मका ६९, तूर ५५, मूग-उडीद ५०, सोयाबीन ६५, कापूस ७९
निम्म्या क्षेत्रावरच खरिपाच्या पेरण्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 5:39 AM