‘खड्डेग्रस्त’ गणेशभक्तांना ‘टोलमुक्ती’चा आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 02:25 AM2017-08-03T02:25:39+5:302017-08-03T02:25:44+5:30
गणेशोत्सवानिमित्त कोकणाकडे कूच करणाºया चाकरमान्यांची संख्या मुंबईत लाखोंच्या घरात आहे. अवघ्या २१ दिवसांवर गणेशोत्सव आल्यामुळे गावाकडे जाणा-या कोकणवासियांमध्ये गणोशोत्सवाची लगबग सुरू आहे.
मुंबई : गणेशोत्सवानिमित्त कोकणाकडे कूच करणाºया चाकरमान्यांची संख्या मुंबईत लाखोंच्या घरात आहे. अवघ्या २१ दिवसांवर गणेशोत्सव आल्यामुळे गावाकडे जाणा-या कोकणवासियांमध्ये गणोशोत्सवाची लगबग सुरू आहे. भाविकांचा प्रवास सुरळीत होण्यासाठी मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, एसटी आणि खासगी लक्झरी वाहने सज्ज होत आहेत. त्यातच गणेशोत्सव काळात २२ ते २४ आॅगस्ट दरम्यान टोलमधून सूट देण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे संबंधित पोलिस स्थानकांत आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) स्टीकर्स १७ आॅगस्टपासून उपलब्ध करुन देणार आहे. हे स्टीकर्स लावलेल्या गाड्यांना टोलमुक्ती मिळणार आहे. या निर्णयामुळे खड्डेग्रस्त गणेशभक्तांना टोलमुक्तीचा आनंद मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
भाविकांच्या दृष्टीक्षेपात गणेशोत्सव आला आहे. तरीदेखील मुंबई ते कोकण मार्गावरील खड्ड्यांचे विघ्न दूर होण्याची चिन्हे नाहीत. परिणामी किमान टोलवसुलीच्या त्रासातून सुटका मिळावी यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने कोकणवासियांना टोलमुक्तीचा प्रसाद दिला आहे. २२ ते २४ आॅगस्ट दरम्यान टोलमधून सूट देण्याची घोषणा सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. टोलमुक्तीसाठी संबंधित पोलिस स्थानकात आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) स्टीकर्स देण्यात येणार आहे. १७ आॅगस्टपासून हे स्टीकर्स प्रवाशांना उपलब्ध होणार आहेत. हे स्टीकर्स दाखवून मुंबईतील प्रवेश नाक्यांवरील टोलनाके, मुंबई -पुणे टोल नाके, खेड-शिवापूर, आणेवाडी, तासवडे, किणी अशा सर्व टोल नाक्यांवर प्रवाशांना टोलमुक्ती मिळणार आहे. हे स्टिकर्स दाखवून कोकणातील परतीच्या प्रवासाला देखील टोलमुक्ती मिळणार असल्याची घोषणा शिंदे यांनी केली आहे.
डेल्टा फोर्ससह ट्रॅफिक वॉर्डन
वाहतूककोंडीमुळे प्रवाशांचा खोळंबा होऊ नये, यासाठी प्रमुख मार्गावर पोलीस दलासोबत डेल्टा फोर्स आणि ट्रॅफिक वॉर्डनची नेमणूक करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहे. शिवाय मार्गावरील खड्डे बुजवण्याच्या सूचनाही संबंधितांना करण्यात आल्या आहेत.
रुग्णवाहिका आणि क्यूआरव्ही सेवा द्या
गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत लाखो प्रवासी कोकणमार्गावर प्रवास करतात. या वेळी आपत्कालीन परिस्थितीत डॉक्टरांसह सुसज्ज अशी रुग्णवाहिका आणि क्विक रिस्पॉन्स व्हेईकल (क्यूआरव्ही) वाहने सज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अपघात आणि वाहने बंद पडल्याने संभाव्य वाहतूककोंडी टाळण्यासाठी ठरावीक ठिकाणी क्रेन्स उपल्बध करुन देण्यात येणार आहे.
वाहतूक नियंत्रणासाठी बैठक
गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाणाºया वाहनांना टोलमाफी आणि वाहतूक नियंत्रण यासाठी महत्त्वाची बैठक एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी पार पाडली. या वेळी एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक पी. एस. मंडपे, पोलीस उपायुक्त अशोक दुधे तसेच पीडब्लूडी, वाहतूक विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. या वेळी वाहतूक व्यवस्था सुरळीत राखण्यासंबंधी शक्य त्या बाबींवर चर्चा करण्यात आली.
जादा गाड्या सोडण्याचा निर्णय-
गणेशोत्सवानिमित्त कोकण मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. वाहतूककोंडी सोडवण्यासाठी रेल्वे आणि रस्ते मार्गावर संबंधित प्रशासनाने अधिक गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. कोकणात जाण्यासाठी मध्य रेल्वेतर्फे २०२ गणपती विशेष फेºया चालवण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेतर्फे देखील कोकणमार्गावर विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहे. शहर व उपनगरातील चाकरमान्यांना त्यांच्या थेट कोकणातील घराच्या दारात सुखरूप सोडण्यासाठी एसटीने तब्बल २ हजार २१६ बसेसची सोय केली आहे. रस्ते मार्गावर प्रवाशांच्या सेवेसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने राज्यातील चालक-वाहकांचा ताफा कोकणाकडे वळविण्याचा निर्णय घेतला आहे.