भूस्खलनालमुळे कशेडी घाट ‘डेंजर’

By admin | Published: August 30, 2016 10:46 PM2016-08-30T22:46:23+5:302016-08-30T23:49:02+5:30

खेड तालुका : मुंबई - गोवा महामार्गावर अनेक वर्षे भूस्खलनाचे प्रकार

Khesdi Ghat 'Danger' due to landslide | भूस्खलनालमुळे कशेडी घाट ‘डेंजर’

भूस्खलनालमुळे कशेडी घाट ‘डेंजर’

Next

खेड : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर गेल्या १२ वर्षांहून अधिक काळ कशेडी घाटातील धामणदिवीपासून काही अंतरावर दरवर्षी होणारे भूस्खलन घाटासाठी धोकादायक ठरत आहे. यंदाही येथे सुमारे दीड ते दोन फूट भूस्खलन झाल्याने या मार्गावरून वाहतूक करणे धोकादायक झाले आहे.
कशेडी घाटातील बहुचर्चित डेंजर झोन पोलादपूरपासून ९ किलोमीटर अंतरावर आहे. सुमारे ११० मीटर्सचा रस्ता दरवर्षी केल्या जाणाऱ्या दुरूस्तीनंतरही सुमारे दीड ते साडेचार फूट खचून दरीच्या दिशेने झेपावत असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च करून राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खर्च करण्यात आला. तरीही हा डेंजर झोन दरवर्षीप्रमाणे यंदाही खचण्यास सुरुवात झाली आहे. १९९८-९९ साली पहिल्यांदा येथे मोरी काढून रस्त्यावर येणारे पाणी दरीमध्ये जाण्यासाठी प्रयत्न झाले. मात्र, त्यानंतर याठिकाणी रस्त्याची मोठ्या प्रमाणात धूप होऊ लागल्याने २00३-0४मध्ये खेड येथील एका कन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत काँक्रीटची मोरी बांधण्यासाठी चक्क ब्लास्टिंग करण्यात आल्यानंतर मोरीचे बांधकाम पूर्ण झाले. मात्र, ब्लास्टिंगमुळे डोंगरातील माती कातळापासून निसटून मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग खचण्यास सुरूवात झाली. यानंतर दरवर्षी याठिकाणी सातत्याने रस्ता खचत असल्याने तात्पुरता भराव करून घाटमार्गावरील वाहतूक सुरू ठेवली जाते.
सन २०१२-१३मध्ये कशेडी घाटामध्ये याठिकाणी काम करण्यासाठी मेगाब्लॉक घेऊन वाहतूक वीर पुलामार्गे कोकणात वळवण्यात आली होती. त्यावेळी थेट २० ते २५ फुटांपेक्षा अधिक खोल कातळापर्यंत जाऊन भराव करण्यात आला आणि काँक्रीटीकरण करण्यात आले. तरीही त्यावर्षी तेथे रस्ता खचल्याने सुनील तटकरे यांचे लक्ष वेधून गणेशोत्सवापूर्वी सतर्कता बाळगण्याची विनंती केली होती. यादरम्यान, खेडबाजूकडील घाट उतारावरून दरड कोसळल्याने कशेडी घाट बंद ठेवण्यात आला होता.
गेल्या तीन वर्षांपासून राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाने घाटाच्या डागडुजीच्या कामांची पूर्तता केली आहे. मात्र, कशेडी घाटातील गटारे, साईडपट्ट्या तसेच रूंदीकरणाच्या कामानंतरही हा रस्ता अपघातांना निमंत्रण देणारच ठरला आहे. आता राज्यातील सत्ताबदलानंतरचे पालकमंत्री प्रकाश मेहता व केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी या कशेडी घाटातील सातत्याने खचणाऱ्या रस्त्याच्या कायमस्वरूपी दुरूस्तीसाठी ठोस प्रयत्न करणे गरजेचे आहे.
महामार्गावरील कशेडी घाट वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे. घाटात संरक्षक भिंत नसल्याने वाहनांसाठी धोका उद्भवतो. त्यामुळे या मार्गावर सुरक्षित प्रवास होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे बनले आहे. अन्यथा हा मार्ग जीवघेणा ठरणार आहे. (प्रतिनिधी)

रस्ता खचला
कशेडी घाटातविविध कामांसाठी होणाऱ्या ब्लास्टिंगमुळे ११० मीटर्सचा रस्ता खचत आहे. त्यामुळे गोव्याकडून येणाऱ्या आणि मुंबईकडून जाणाऱ्या वाहनांना दरडीसोबत दरीमध्ये घेऊन जाईल, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

Web Title: Khesdi Ghat 'Danger' due to landslide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.