मुंबई : दहीहंडीचा उत्सव गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. दीड महिना आधीपासून शहर- उपनगरातील दहीहंडी पथके सरावाला सुरुवात करतात. तर वीकेंडला हा सराव जोमाने केला जातो, मात्र मागील ३-४ दिवसांपासून मुसळधार पावसाने दहीहंडी सरावातही व्यत्यय आणला असून यामुळे सरावात काहीसा खंड पडला आहे.पावसामुळे होणाºया चिखलात गोविंदा माखून निघतात पण तो चिखलदेखील त्यांना दहीहंडीच्या दिवशी दहीकाल्यासारखा भासतो. चिखलात लोळून थर लावताना पाय सरकला जाण्याची शक्यता असते पण तरीदेखील पाऊस मात्र त्यांना हवाच असतो. परंतु, दहीहंडी पथकांच्या प्रशिक्षकांकडून ही काळजी कटाक्षाने घेतली जाते, गेल्या काही वर्षांपासून उत्सवानिमित्त ‘शून्य अपघात’ या उक्तीची अंमलबजवाणीवर अधिक भर दिला जात आहे. त्या दृष्टीकोनातून पावसाचे प्रमाण कमी असल्यास सराव करतात मात्र मुसळधार पावसादरम्यान सराव बंद असतो अशी माहिती श्री दत्त गोविंदा पथकाचे प्रशिक्षक बाळा पडेलकर यांनी दिली. त्याचप्रमाणे, पावसामुळे बाहेरुन सरावासाठी येणारी मुलंही कमी होतात. त्यामुळे सरावावर परिणाम होताना दिसून येतो.शाळा-कॉलेजातून, आॅफिसातून घरी येऊन ठरलेल्या वेळी ठरल्या ठिकाणी एकत्र भेटून, एकमेकांच्या सोबतीने, पडत धडपडत, रात्र रात्र जागरण करून, सराव करून दहीहंडी पथक मोठ्या मेहनतीने तयार करतात. सराव देखील पावसाळ्याच्याच दिसतात असल्यामुळे सराव करताना आलेला पाऊसही जरी त्यांच्या सरावात व्यत्यय आणतो. पावसादरम्यान ताडपत्री अंथरुन खेळाडूंची पूर्णत: काळजी घेऊनच सराव केला जातो, अशी माहिती माझगावच्या गोविंदा पथकाचे प्रशिक्षक अरुण पाटील यांनी दिली.पावसाच्या पाण्याशी संपर्क आल्यास वैद्यकीय सल्ला घ्या!मुंबई : ज्या नागरिकांचा पावसाच्या पाण्याशी संबंध आला होता, तसेच ज्या व्यक्ती गम बूट वापरण्यासारखी खबरदारी न घेता पावसाच्या पाण्यातून चालत गेल्या होत्या, त्यांना लेप्टोचा संसर्ग होण्याची शक्यता असते. जखम/जखमा /खरचटलेला भाग असलेल्या ज्या व्यक्तींचा पावसाच्या पाण्याशी संबंध आला असेल, अशा व्यक्तींना लेप्टोचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळेच पावसाच्या पाण्याशी संपर्क आलेल्या व्यक्तींनी २४ ते ७२ तासांच्या आत वैद्यकीय सल्ला घेऊन प्रतिबंधात्मक औषधोपचार करणे गरजेचे आहे, अशी सूचना मुंबई महापालिकेने केली आहे.अतिवृष्टी दरम्यान पावसाच्या साचलेल्या पाण्यातून नागरिकांना चालावे लागते. या पाण्यात लेप्टो या रोगाचे लेप्टोस्पायरा या सूक्ष्मजंतूचा प्रादुर्भाव असू शकतो. उंदीर, कुत्रे, घोडे, म्हशी इत्यादी प्राण्यांच्या लघवीद्वारे लेप्टोचे जंतू पावसाच्या पाण्यात संसर्गीत होतात. अशा बाधित झालेल्या पाण्याशी माणसाचा संबंध आल्यास त्याला लेप्टोची बाधा होण्याची शक्यता असते, तसेच व्यक्तीच्या पायाला किंवा शरीराच्या कोणत्याही भागाला जखम असेल, तर या जखमेतून लेप्टोचे जंतू माणसाच्या शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे ज्या व्यक्तींचा पावसाच्या पाण्याशी संपर्क आला असेल, त्यांनी तातडीने प्रतिबंधात्मक औषधोपचार करावेत, असे महापालिकेचे म्हणणे आहे.पावसाळ्यात कोणताही ताप डेंग्यू, मलेरिया अथवा लेप्टोस्पायरोसिस असू शकतो. त्यामुळे तापाकडे दुर्लक्ष न करता, त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.पायावर जखम असल्यास साचलेल्या पाण्यातून ये-जा करणे टाळावे किंवा गमबुटाचा वापर करावा. साचलेल्या पाण्यातून चालून आल्यावर पाय साबणाने स्वच्छ धुऊन कोरडे करावे.साचलेल्या पाण्यातून चालल्यामुळे लेप्टोस्पायरोसिस संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लेप्टोस्पायरोसिस प्रतिबंधात्मक उपचार तातडीने घेणे आवश्यक आहे.पुरेशी विश्रांती, पोषक आहार व वेळेत उपचार घ्यावा. उंदीर नियंत्रणासाठी उंदराला अन्न मिळू न देणे, उंदराचे सापळे रचणे, त्याला विष घालणे इत्यादी मार्ग तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार वापरात आणावे.
पावसाने घातला दहीहंडी पथकांच्या सरावात ‘खो’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2019 1:44 AM