Join us

"खोके सरकारने आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर घालवला; गुजरातमध्ये गेला’’, आदित्य ठाकरेंचा घणाघाती आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2022 11:10 PM

Aditya Thackeray: वेदांता फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क, मेडिकल इक्विपमेंट पार्कनंतर आणखी एक प्रकल्प राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्याबाहेर गेला, असा सनसनाटी आरोप उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

मुंबई - वेदांता फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क, मेडिकल इक्विपमेंट पार्कनंतर आणखी एक प्रकल्प राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्याबाहेर गेला, असा सनसनाटी आरोप उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे. खोके सरकारने अजून एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर घालवला. खोके सरकारवर उद्योगजगताचा विश्वास उरलेला नाही, असा प्रहार आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

या मुद्यावरून युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे शिंदे-फडणवीस सरकारविरोधात चांगलेच आक्रमक झाले आहेत. ते म्हणाले की, ‘टाटा एयरबस प्रकल्प’ महाराष्ट्राबाहेर जाऊ नये यासाठी प्रयत्न करा, अशी मागणी मी जुलै महिन्यापासून सातत्याने करत होतो. पण पुन्हा तेच झालं. गेल्या तीन महिन्यांपासून सातत्याने महाराष्ट्रातले प्रकल्प बाहेर का जात आहेत? खोके सरकारवर उद्योगजगताचा विश्वास उरलेला नाही आहे, हे तर दिसतच आहे. आता ४ प्रकल्प महाराष्ट्रातून निसटल्यावर तरी उद्योगमंत्री राजीनामा देणार का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

दरम्यान, वेदांता फॉक्सकॉर्न प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्यावर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे वादळ निर्माण झाले होते. हा प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने शिंदे-फडणवीस सरकरावर जोरदार टीका झाली होती. त्यानंतर आता टाटा एअरबस प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांना करून त्यावरून शिंदे फणडवीस सरकारवर टीका केल्याने आता पुढच्या काही दिवसांत यावरून वाद पेटण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :आदित्य ठाकरेमहाराष्ट्र सरकारएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीस