दरड परिसरात ‘धोक्या’चे फलक
By admin | Published: May 7, 2017 06:49 AM2017-05-07T06:49:44+5:302017-05-07T06:49:44+5:30
दरड परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना दरवर्षीप्रमाणे धोक्याची सूचना देण्याची तयारी महापालिकेने केली आहे. दरड परिसरात संरक्षक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दरड परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना दरवर्षीप्रमाणे धोक्याची सूचना देण्याची तयारी महापालिकेने केली आहे. दरड परिसरात संरक्षक भिंत बांधण्यात येते. मात्र, त्याचा फारसा उपयोग होत नसून, पालिकेलाही मर्यादित अधिकार आहेत. त्यामुळे सालाबादप्रमाणे दरड परिसरात जनजागृती फलक लावण्याचे सोपस्कार पालिका प्रशासन पार पाडणार आहे.
मुंबईतील अनेक टेकड्या, डोंगर परिसरात व पायथ्याशी सुमारे २० हजार झोपड्या धोकादायक स्थितीत वसल्या आहेत. या झोपड्यांमध्ये सुमारे लाखभर रहिवासी गेली अनेक वर्षे मृत्यूच्या दाढेत दिवस काढत आहेत. या झोपड्यांना स्थलांतरित करण्यासाठी दरवर्षी पावसाळ्यात नोटीस बजावण्यात येते. मात्र, मुंबईत जागेची टंचाई आणि डोक्यावरचे छप्पर हरविण्याच्या भीतीने हजारो मुंबईकर जीव मुठीत घेऊन जगत आहेत.
गतवर्षी पालिकेने केलेल्या सर्वेक्षणात अशा २८४ ठिकाणी पावसाळ्यात दरड कोसळण्याचा धोका होता. गेल्या २० वर्षांमध्ये दरड कोसळून २०९ लोकांचा बळी गेला आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात असा कोणताही प्रसंग टाळण्यासाठी सावधगिरी म्हणून या रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याची सूचना पालिकेने दिली आहे. अशा अडीच हजार झोपडपट्ट्यांना नोटिसा बजावण्यात येणार आहे.
ही आहेत ठिकाणे...
ग्रँट रोड, भांडुप, कुर्ला, गोवंडी, मानखुर्द आणि मालाड या भागांमध्ये दरडी कोसळण्याची शक्यता असणारी ठिकाणे आहेत. या ठिकाणी ठळकपणे दिसतील व अधिक काळ टिकतील, असे जनजागृतीपर फलक लावण्याचे आदेश शनिवारच्या बैठकीदरम्यान देण्यात आले.