खोपोलीत पेशवेकालीन समाधीची दुरवस्था
By admin | Published: January 11, 2015 10:23 PM2015-01-11T22:23:58+5:302015-01-11T22:23:58+5:30
खोपोली नगरपालिका क्षेत्रातील गगनगिरी महाराज नगरमधील पेशवेकालीन समाधीची दुरवस्था झाली आहे
अमोल पाटील, खालापूर
खोपोली नगरपालिका क्षेत्रातील गगनगिरी महाराज नगरमधील पेशवेकालीन समाधीची दुरवस्था झाली आहे. ऐतिहासिक समाधीस्थळाचे ठिकाण सध्या अनधिकृत डम्पिंग ग्राउंड बनल्याने परिसरातील नागरिकांसह गगनगिरी मठामध्ये येणाऱ्या भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सुंदर शहर बनण्यासाठी शहरातील ऐतिहासिक ठिकाणांकडे नगर पालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष होत असताना रायगड जिल्हा पत्रकार संघटनेकडून समाधी स्थळ सुशोभीकरणासाठी पुढाकार घेण्यात आला आहे .
देव नगरी म्हणून ओळख असलेल्या खोपोली शहराला आध्यात्मिक परंपरा आहे. सुंदर आणि स्वच्छ शहरासाठी पालिकेकडून वारंवार जनजागृती करण्यात येत असतानाही वरची खोपोली परिसरातील गगनगिरी नगरमधील शक्ती सोसायटीजवळ असणाऱ्या चिंचेच्या झाडाखालील ऐतिहासिक समाधी स्थळाची पुरती दुर्दशा झाली आहे. या समाधीच्या अगदी जवळ प्राचीन वीरेश्वर शंकर मंदिर असून याच मार्गावरून काही अंतरावर गगनगिरी महाराज आश्रम आहे. पेशवेकालीन समाधी असल्याचे या भागातील नागरिक सांगत असून रस्त्याच्या बाजूलाच असणाऱ्या या समाधी स्थळाची जागा सध्या अनधिकृत डम्पिंग मैदान बनत आहे.
या परिसरातील नागरिक आणि बांधकाम व्यावसायिक माती, दगड तर अन्य कचरा समाधीच्या ठिकाणी आणून टाकत आहेत. त्यामुळे या ढिगाऱ्याखाली समाधी गाडून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. शहरातील पर्यावरणप्रेमींनी अनेकदा नगर पालिका, नगरसेवक यांच्याकडे याबाबत तक्रारी करूनही कार्यवाही होत नसल्याने पर्यावरणप्रेमींसह या परिसरातील रहिवाशांनी पालिकेच्या ढिसाळ कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली आहे.