स्थानिक राजकारणातील खुन्नस पोहोचली राड्यापर्यंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:06 AM2021-06-17T04:06:00+5:302021-06-17T04:06:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : शिवसेना आणि भाजपच्या ताणलेल्या संबंधांचीच चुणूक बुधवारी शिवसेना भवनसमोरील राड्याच्या निमित्ताने पाहायला मिळाली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शिवसेना आणि भाजपच्या ताणलेल्या संबंधांचीच चुणूक बुधवारी शिवसेना भवनसमोरील राड्याच्या निमित्ताने पाहायला मिळाली आहे. ही घटना येत्या काळात शिवसेना विरुद्ध भाजप संघर्षाची नांदी ठरण्याची शक्यता आहे.
दीर्घकाळ युतीचे राजकारण करणाऱ्या शिवसेना आणि भाजपमध्ये सध्या विस्तवही जात नाही. मुंबईत ‘आवाज कुणाचा’ या प्रश्नाचे उत्तर मागील महापालिका निवडणुकीत मिळाले नाही. तेव्हापासून मुंबईत दोन्ही पक्षाचे नेते, पदाधिकारी एकमेकांना भिडले आहेत. मागच्या पालिका निवडणुकीत जो प्रश्न अनिर्णीत राहिला त्याचा निकाल या निवडणुकीत लावण्यासाठी दोन्ही पक्षांतील वरिष्ठ नेते सज्ज झाले आहेत. तर, स्थानिक पातळीवरचे नेतेही एकमेकांना खुन्नस देऊन आहेत. या स्थानिक खुन्नसमुळेच आजचा राडा झाल्याचे चित्र आहे. भाजयुमोचे आंदोलक आंदोलन करून गेले आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांची राजकीय खुन्नस राड्याच्या निमित्ताने समोर आली.
मागील पालिका आणि विधानसभा निवडणुकांच्या निकालांनी मुंबईत भाजप आणि शिवसेना तुल्यबळ असल्याचे दाखवून दिले आहे. आगामी पालिका निवडणुकीत आपलीच सरशी व्हावी, यासाठी शिवसेना राज्यातील सत्तेचा खुबीने वापर करत राजकीय मांडणी करत आहे. तर, भाजप नेत्यांनीही मागची कसर भरून काढण्यासाठी कंबर कसली आहे. त्याचा परिणाम स्थानिक पातळीवरही दिसत आहे. त्यामुळे पुढच्या वर्षीच्या पालिका निवडणुकांचा निकाल लागेपर्यंत स्थानिक पातळीवर राजकीय स्पर्धा, संघर्षाचे रूपांतर राड्यातच होत राहणार का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.