ख्वाजा युनूस कोठडी मृत्यू प्रकरण, पोलीस आयुक्तांविरुद्ध अवमान याचिका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 05:13 AM2020-06-24T05:13:24+5:302020-06-24T05:13:30+5:30
चार पोलिसांना सेवेत पुन्हा रुजू केल्याप्रकरणी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे.
मुंबई : घाटकोपर बॉम्बस्फोट प्रकरणातील कथित आरोपी ख्वाजा युनूस कोठडी मृत्यूप्रकरणी आरोपी असलेल्या चार पोलिसांना सेवेत पुन्हा रुजू केल्याप्रकरणी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे.
ख्वाजा युनूसची आई असिया बेगम यांनी ज्येष्ठ वकील मिहीर देसाई यांच्याद्वारे उच्च न्यायालयात परमबीर सिंग यांच्याविरोधात अवमान याचिका दाखल केलीे. चार आरोपी पोलिसांना जाणुबुजून सेवेत रुजू करून घेण्यात आले आणि उच्च न्यायालयाच्या २००४ च्या आदेशाचा हेतुपूर्वक अवमान केला. २००४ मध्ये उच्च न्यायालयाने चार आरोपी पोलिसांना सेवेत रुजू न करून घेण्याचे आदेश सरकारला दिले होते. साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे, हवालदार राजेंद्र तिवारी, सुनील देसाई आणि राजाराम निकम यांच्यावर ख्वाजा युनूसची हत्या व पुरावे नष्ट केल्याप्रकरणी खटला सुरू आहे. या चौघांची अद्याप खातेनिहाय चौकशी सुरू झाली नसल्याचे असिया यांनी याचिकेत म्हटले आहे.
चारही पोलिसांना २००३-०४ पासून निलंबित करण्यात आले आहे, तर वाझे यांनी २००८ मध्ये राजीनामा देऊन शिवसेनेमध्ये सामील झाले. २०१९ मध्ये शिवसेनेची सत्ता आल्यानंतर जून २०२० मध्ये आढावा समितीने निलंबनाचा निर्णय मागे घेत त्यांना सेवेत रुजू करण्याची शिफारस केली. या प्रकरणी मुंबई पोलीस आयुक्तांसह गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांच्यावरही न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई करावी, त्यांना सेवेत रुजू करून घेऊ नये. याशिवाय पोलीस आयुक्त व अमिताभ गुप्ता यांना एक लाख रुपयांचा दंड ठोठवावा, अशी मागणी असिया यांनी केली आहे.
याप्रकरणी न्यायालयाने परमबीर सिंग यांना नोटीस बजावत उत्तर देण्याचे निर्देश दिले.