भीक मागण्यासाठी चिमुरड्याचे अपहरण, मालवणी पोलिसांकडून २४ तासांत सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 07:55 AM2018-12-20T07:55:16+5:302018-12-20T07:56:01+5:30
भीक मागण्यासाठी शेजाऱ्याने सहा वर्षांच्या मुलाचे अपहरण करण्याचा धक्कादायक प्रकार मालवणी परिसरात घडला होता.
मुंबई: भीक मागण्यासाठी शेजाऱ्याने सहा वर्षांच्या मुलाचे अपहरण करण्याचा धक्कादायक प्रकार मालवणी परिसरात घडला होता. मात्र अत्यंत शिताफीने तपास करत अवघ्या चोवीस तासात त्याची सुखरूप सुटका पोलिसांनी करत अपहरणकर्त्याला बेड्या ठोकल्या. रमेश नाडे असे अटक करण्यात आलेल्या अपहरणकर्त्याचे नाव आहे. तो मालवणीच्या अंबुजवाडी परिसरात राहत असून बेरोजगार आहे. त्याला दारूचेही व्यसन आहे.
मंगळवारी त्याच्या घराशेजारी राहणारा सहा वर्षांचा रोहन ( नावात बदल ) याला फिरायला जाऊ असे सांगत नाडे घेऊन गेला. त्यावेळी त्याची दोन मुलासोबत त्याच्यासोबत होती. नाडे रोहन आणि मुलांना घेऊन रेल्वेमध्ये चढला आणि त्या ठिकाणी त्यांना भीक मागायला लावली. त्यानंतर त्याच्या मुलांना घेऊन तो घरी आला मात्र रोहनला त्याने गोरेगाव रेल्वे स्थानकावर सोडले. बराच वेळ रोहन घरी न परतल्याने त्याच्या घरच्यांनी सर्वत्र शोधाशोध सुरू केली. मात्र तो कुठेच सापडला नाही. नाडेच्या मुलाने रोहनच्या आईला घडलाप्रकार सांगितला तसेच त्याच्या वडिलांनीच रोहनला रेल्वे स्थानकावर सोडल्याचेही तो म्हणाला.
याबाबत रोहनच्या घरच्यांनी मालवणी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. त्यानुसार मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक फटांगरे यांनी या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत गोरेगाव परिसरात रोहनच्या शोधासाठी पथक पाठवले. रेल्वे स्थानकावर रोहन कुठेच सापडला नाही. अखेर त्याला गोरेगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आल्याची माहिती या पथकाला मिळाली आणि त्यांनी रोहनला ताब्यात घेत मालवणी गाठले. त्याला त्याच्या पालकांच्या स्वाधीन करीत नाडेला अटक करण्यात आली.