शिवसेनेतील बंडखोर नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील आमदाराच्या मुलाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंदुकीचा धाक दाखवून एका उद्योजकाला खोट्या कागदपत्रांवर सह्या करण्यास भाग पाडण्यात आले. बुधवारी रात्री ९ वाजता ही घटना घडली. याप्रकरणी, भादवि कलम ३६४-A, ४५२, १४३, १४७, १४९, ३२३, ५०४ आणि ५०६ व ३, २५ शस्त्रास्त्र अधिनियमप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. राज सुर्वे असे आरोपीचे नाव असून ते आमदारप्रकाश सुर्वे यांचे पुत्र आहेत.
राज सुर्वे यांच्यासह मनोज मिश्रा, विकी शेट्टी, पद्माकर आणि १० ते १२ अनोळखी इसमांविरोधात वनराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून वनराई पोलीस पुढील तपास करत आहेत.
एका म्युझिक कंपनीच्या सीईओचे अपहरण करण्यात आल्याच्या आरोप राज सुर्वे यांच्यावर आहे. राज सुर्वे यांनी बंदुकीचा धाक दाखवत कंपनीच्या सीईओला काही आर्थिक देवाण-घेवाणीसंदर्भातील कागदपत्रांवर सह्या करण्यास भाग पाडले, असे फिर्यादीत म्हटले आहे. अगोदर, १० ते १५ जणांनी राजकुमार सिंग यांना मारहाण केली. त्यानंतर, ऑफिसमधून जबरदस्तीने प्रकाश सुर्वे यांच्या दहिसर पूर्वमधील कार्यालयात घेऊन गेले. तिथे राज सुर्वे बसलेला होता. मनोज मिश्राही तिथे होता. तिथेच राज सुर्वे आणि मनोज मिश्राने राजकुमार सिंग यांच्याकडून दोघांमध्ये करार रद्द झाल्याचे लिहून घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
असा झाला होता करार
राजकुमार जगदीश सिंग (वय ३८) यांनी राज प्रकाश सुर्वे याच्याविरुद्ध तक्रार दिली आहे. राजकुमार हे ग्लोबल म्युझिक जंक्शन प्रा.लि. या कंपनीचे सीईओ आहेत. दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची कंपनी डिजिटल लॅटरल ठेवून कर्जही देते. मनोज मिश्रा यांची आदिशक्ती प्रा.लि. म्युझिक कंपनी आहे. त्यांना राजकुमार सिंग हे २०१९ पासून सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळखतात. मनोज मिश्रांना पैशाची गरज होती. त्यामुळे त्या कंपनीचे लायसन्स गहाण ठेवून राजकुमार यांनी कर्ज दिले. एका वर्षासाठी हा करार झाला होता.