मुंबई : भररस्त्यात रियल इस्टेट व्यावसायिकाची कार थांबवून त्रिकुटाने त्यांचे अपहरण केले. पुढे कारमधील दोन लाखांसह त्याच्या सुटकेसाठी नातेवाइकांकडे आणखी १० लाखांची मागणी केली. घाबरल्यामुळे नातेवाइकांनी पोलिसांची मदत घेतली नाही. पैसे देऊन व्यावसायिकाची सुटका करून घेतल्यानंतरच, त्यांनी बुधवारी या प्रकरणी माहिम पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानुसार, माहिम पोलीस या त्रिकुटाचा शोध घेत आहेत. त्यांच्याविरुद्ध अपहरण, खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माहिम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार, २६ जुलै रोजी रात्री ८च्या सुमारास ही घटना घडली. माहिममधील व्यावसायिक कारने प्रवास करत होते. त्यांच्यासमोरच इनोवामधून आलेल्या त्रिकुटाने त्यांची कार अडवली. त्यानंतर, चाकूचा धाक दाखवत चालकाला तेथून पळवून लावले. व्यासायिकाच्या कारमध्ये त्यांना २ लाखांची रोकड सापडली. त्यानंतर, त्यांच्याच कारमधून या त्रिकुटाने त्यांना अनोळखी ठिकाणी नेले. तेथून त्यांच्या कुटुंबीयांना फोन लावून त्यांच्याकडे १० लाखांची मागणी केली. कुटुंबीयांनीही याबाबत पोलिसांना काहीही न सांगता पैसे घेऊन घटनास्थळ गाठले. पैसे दिल्यानंतर व्यावसायिकाला सोडले. तेथून व्यावसायिकाने नातेवाइकांसह घर गाठले.त्यानंतर, बुधवारी पोलीस ठाणे गाठून त्यांनी घडलेला प्रकार सांगितला. व्यावसायिकाच्या पोलिसांनी तक्रारीवरून अनोळखी त्रिकुटाविरुद्ध अपहरण, खंडणीचा गुन्हा दाखल केला. परिसरातील सीसीटीव्हीद्वारे ते आरोपींचा शोध घेत आहेत. घडलेल्या घटनाक्रमाची शहानिशा पोलीस करत आहेत. घटनेच्या दिवशी पाऊस असल्याने आरोपींचा चेहरा सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसत नाही, तरीही आरोपींची चेहरेपट्टी, तसेच खबऱ्यांच्या मदतीने ते अधिक तपास करत आहेत.