लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गेल्या आठवड्यात एक अल्पवयीन मुलगी घरातून अचानक गायब झाल्याने या प्रकरणी सांताक्रुझ पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. मात्र ती मुलगी तिच्या आईच्या घरी राहायला गेली होती, पोलिसांनी गुरुवारी शोधून काढले.मिनी (नावात बदल) ही १० वर्षांची मुलगी सांताक्रुझच्या गजधरबांध परिसरात वडील मुकेश गौड आणि सावत्र आईसोबत राहते. ३० जून रोजी ही मुलगी घरातून खारदांडामध्ये असलेल्या शाळेत जाण्यासाठी निघाली. मात्र घरी परतलीच नाही. या प्रकरणी तिच्या घरच्यांनी तिचा सर्वत्र शोध घेत अखेर सांताक्रुझ पोलिसांना कळविले. ही मुलगी लहान असल्याने सांताक्रुझ पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करत तिचा शोध सुरू केला. यासाठी मैदान, रेल्वे आणि बस स्थानक, रिक्षा, चौपाट्या तसेच पार्किंग सगळीकडे तिचा शोध पोलिसांनी घेतला, मात्र ती कुठेच सापडली नाही. मिनीचे वडील आणि आजोबांच्या चौकशीत सख्खी आई त्यांच्यासोबत राहत नसल्याचे समोर आले. ती तीन वर्षांची असताना तिला सोडून दुसऱ्या व्यक्तीसोबत निघून गेल्याचे पोलिसांना समजले. तेव्हा पोलिसांनी तिच्या आईचा शोध घेण्यास सुरुवात केली, जी वसईला राहत असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार पोलिसांचे एक पथक वसईला गेले आणि त्यांनी मिनीच्या आईचा शोध घेतला. तेव्हा मिनी तिच्याकडे सापडली. पोटच्या पोरीच्या मायेपोटी तिने मिनीला सोबत घरी नेल्याचे पोलिसांना सांगितले. सध्या मिनीदेखील तिच्या आईसोबतच राहत आहे. या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने नमूद केले.
अपहृत मुलगी सापडली आईकडेच
By admin | Published: July 07, 2017 6:48 AM