दिल्लीहून अपहृत झालेली मुलगी मुंबईत सापडली

By admin | Published: July 29, 2014 12:55 AM2014-07-29T00:55:42+5:302014-07-29T00:55:42+5:30

दोन वर्षांच्या चिमुरडीला दिल्लीतून पळवून आणणाऱ्या नवविवाहित दाम्पत्यासह तिघांना एमआरए मार्ग पोलिसांनी गजाआड केले

A kidnapped girl from Delhi was found in Mumbai | दिल्लीहून अपहृत झालेली मुलगी मुंबईत सापडली

दिल्लीहून अपहृत झालेली मुलगी मुंबईत सापडली

Next

मुंबई : दोन वर्षांच्या चिमुरडीला दिल्लीतून पळवून आणणाऱ्या नवविवाहित दाम्पत्यासह तिघांना एमआरए मार्ग पोलिसांनी गजाआड केले. या चिमुरडीला कडेवर घेऊन हुतात्मा चौकात संशयास्पदरित्या फिरणाऱ्या चाळीशीतल्या महिलेला पाहून एका सतर्क पादचाऱ्याने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला होता. त्यामुळेच पोलीस अपहृत चिमुरडीची सुटका करू शकले. अटकेत असलेले तिघे मूल चोरणाऱ्या टोळीचे सदस्य असावेत, असा संशय पोलिसांना आहे.
सुमन राजू पटेल (४०), गिन्नी अशोक पोहार (२०) आणि त्याची पत्नी काजल (१९) अशी गजाआड झालेल्या तिघांची नावे आहेत. त्यापैकी सुमन या चिमुरडीला कडेवर घेऊन हुतात्मा चौकात फिरत होती. तिच्या संशयास्पद हालचाली आणि कडेवरील मूल सतत रडत असल्याने पादचाऱ्याला संशय आला. त्याने पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून सतर्क केले. त्यानुसार एमआरए मार्ग पोलिसांनी सुमनला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. तेव्हा बहिणीचा मुलगा गिन्नी आणि त्याची पत्नी काजल या दोघांनी या मुलीला दिल्लीहून पळवून आणल्याची कबुली दिली. त्यानुसार या दोघांना ताब्यात घेण्यात आले.
काजल दिल्लीची असून गेल्या महिन्यात दोघे तेथे गेले होते. जंतर मंतर परिसरातील एका गुरुद्वारात लंगर उरकून बाहेर पडताना दोघांनी या एकाकी चिमुरडीला पाहिले. कोणालाही न कळवता ते या मुलीला घेऊन मुंबईला आले, असे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, एमआरए मार्ग पोलिसांनी पार्लमेंट मार्ग पोलिसांना फोन करून गेल्या महिन्यात दोन वर्षांची मुलगी हरविल्याची तक्रार दाखल झाली आहे का, अशी विचारणा केली. तेव्हा तेथील पोलिसांनी ३० जूनला सुनीता रमेश कुमार या विवाहितेने आपली मुलगी हरविल्याची तक्रार दिल्याचे एमआरएमार्ग पोलिसांना कळवले. तेव्हा पोलिसांनी सुटका केलेल्या मुलीचा फोटो दिल्ली पोलिसांना पाठविला. तेव्हा हीच मुलगी हरविली होती, हे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी तिघांना अटक केली. या प्रकरणाचा तपास दिल्ली पोलीस करण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सुटका केलेल्या मुलीची रवानगी डोंगरी बालसुधारगृहात करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. तिची वैद्यकीय चाचणी सुरू असून, शरीरावर कोणत्याही प्रकारची जखम आढळलेली नाही. (प्रतिनिधी)

Web Title: A kidnapped girl from Delhi was found in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.