Join us

कर्ज फेडण्यासाठी दिराच्याच मुलाचे केले अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2018 6:04 AM

विविध ठिकाणांहून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी महिलेने ५० लाखांसाठी दिराच्याच मुलाच्या अपहरणाचा कट रचल्याची धक्कादायक माहिती गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईतून उघड झाली.

मुंबई : विविध ठिकाणांहून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी महिलेने ५० लाखांसाठी दिराच्याच मुलाच्या अपहरणाचा कट रचल्याची धक्कादायक माहिती गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईतून उघड झाली. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या कक्ष ४ने शबीना खान (३७) हिच्यासह पाच जणांना अटक केली आहे. शिवाय तीन दिवस डांबून ठेवलेल्या अल्पवयीन मुलाचीही सुखरूप सुटका केली आहे.कुर्ला पश्चिमेकडील म्हाडा कॉलनी परिसरात शबीना राहते. तिच्या समोरच्याच इमारतीत तिचा दीर राहतो. शबीनाने विविध ठिकाणांहून कर्ज घेतले होते. कर्जबाजारीपणामुळे ती झटपट पैसा मिळविण्यासाठी धडपड करू लागली. सुरुवातीला बँकेतून डीडीद्वारे पैसे वठविण्याचे तिने ठरविले. मात्र त्यातून काहीच मार्ग निघाला नाही. दरम्यान, ती सुलातना रियाजउल्ला खान (२६), जहांगिर हैदरअली शेख (२८), विल्यम उर्फ सोहेल अहमद सिद्दिकी (३३), गुफरान मोहमद आरिफ शेख (२६) यांच्या संपर्कात आली. सुलतान हा वापरलेल्या गाड्या विक्रीचा व्यवसाय करतो. गुफरान हा रिक्षाचालक आहे.तिने दिराकडील पैशांबाबत त्यांना सांगितले. दीर व्यावसायिक असून नामांकित कंपनीत व्यवस्थापक आहे. त्याचे छोट्या मुलावर खूप प्रेम आहे. मुलासाठी तो कोट्यवधी रुपये देईल असे तिने सांगितले. त्यानंतर मुलाचे अपहरण करून २ कोटी रुपये उकळण्याचा कट रचला. तडजोडीअंती ५० लाखांची खंडणी उकळण्याचे ठरले. ठरल्याप्रमाणे, ३ आॅगस्टला रात्री ९च्या सुमारास शबीनाने चावी घेण्याच्या बहाण्याने मुलाला खाली बोलावले. या वेळी मोठा १३ वर्षीय मुलगा आला. इमारतीखाली दबा धरून बसलेल्या तिच्या साथीदारांनी त्यालाच चाकूच्या धाकात रिक्षात बसवून त्याचे अपहरण केले. त्याला सुरुवातीला शिवाजीनगर येथील रहिवासी असलेल्या विल्यमच्या घरी डांबले. त्याने पळण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याला मारहाण केली आणि त्याच्या लहान भावाचेही अपहरण केले आहे असे सांगत त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. भीतीने मोठा मुलगा घाबरून शांत राहिला. दुसऱ्या दिवशी त्याला सुलतानच्या येथीलच एका गाळ्यात कोंडून ठेवले. त्याने आरडाओरडा करूनये म्हणून जेवणही दिले नाही.बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांनी विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांसोबतच या प्रकरणी गुन्हे शाखेच्या कक्ष ४नेही समांतर तपास करून आरोपींना अटक केली; तसेच मुलाचीही सुटका केली. त्या मुलाने सुटल्यानंतर चिठ्ठी लिहून गुन्हे शाखेचे आभार मानले.>सिम कार्डमुळे अडकले जाळ्यातमुलाच्या वडिलांना फोन करण्यासाठी नवीन सिम कार्ड घेणे गरजेचे आहे. आपल्या नावाने नवीन सिम कार्ड घेतल्यास आपली माहिती उघड होईल, या भीतीने जेथे कागदपत्रांची पूर्तता होत नाही अशा ठिकाणांचा आरोपी शोध घेऊ लागले. हीच माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार, गुन्हे शाखेने शबीनासह पाच जणांना बेड्या ठोकल्या.>या पथकाची कामगिरीगुन्हे शाखेच्या कक्ष ४चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदेश रेवले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी विनोद माळवे, पोलीस अंमलदार नार्वेकर, शिरगावकर, गुरव, बल्लाळ, मांढरे, पिलवटे, साळुंखे या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी केली.

टॅग्स :अपहरण