नालासोपारा - नालासोपाऱ्याच्या आचोळे डोंगरी येथील नेहा बिडलान (२१) यांची एक वर्षाची मुलगी सांन्वी, हिचे बुधवारी १५ फेब्रुवारीला दुपारी साडेचारच्या सुमारास, सुरक्षा रक्षक आरोपी राजेंद्र कुमारने अपहरण केले होते. ती अपहरण झालेली चिमुकली आचोळे पोलिसांच्या पथकाला बिहारमध्ये आरोपीच्या गावी सापडली. आरोपी व अपहरण झालेल्या चिमुकलीला पोलीस बुधवारी नालासोपाऱ्यात घेऊन येणार आहे.
एक वर्षाच्या चिमुकल्या सांन्वीचे आरोपी सुरक्षा रक्षकाने अपहरण केल्याची धक्कादायक घटना नालासोपाऱ्यात घडली होती. आचोळे पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपासासाठी वेगवेगळे पथके तयार केली होती. या चिमुकलीच्या शोधासाठी गुन्हे शाखेचे तिन्ही युनिटही प्रयत्न करत होते. पळवून नेतानाचे काही ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले होते. पोलिसांची सर्वत्र जोरदार शोधमोहीम सुरू होती. अखेर आचोळे पोलिसांना ती मुलगी सापडली आहे. नेमके आरोपीने या मुलीचे अपहरण का व कोणत्या कारणामुळे केले याचा पोलीस तपास करत आहे. सदर आरोपी हा मागील सात ते आठ वर्षांपासून याठिकाणी काम करत होता. याबाबत अद्याप काहीही माहीत नसल्याचे व मुलगी आल्यावर पत्रकार परिषद घेणार असल्याचे आचोळ्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांनी लोकमतला सांगितले.