Join us

आरटीओ एजंटचे अपहरण करत मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 4:06 AM

- दोघाना अटक, तर दोघे फरारआरटीओ एजंटचे अपहरण करून मारहाणकुरार पाेलिसांकडून दोघांना अटक; डोमिसाईल बनवून घेण्यास ...

- दोघाना अटक, तर दोघे फरार

आरटीओ एजंटचे अपहरण करून मारहाण

कुरार पाेलिसांकडून दोघांना अटक; डोमिसाईल बनवून घेण्यास नकार दिल्याचा राग

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई: डोमिसाईल सर्टिफिकेट बनवून घेण्यास नकार दिल्याच्या रागात आरटीओ एजंटचे चौघांनी अपहरण करत त्याला बेदम मारहाण केली. याप्रकरणी कुरार पोलिसांनी दोघांना अटक केली असून अन्य दोन आरोपींचा शोध सुरू आहे.

प्रशांत परब व रवींद्र दळवी अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दाेघांची नावे आहेत. परब हा शिवसेनेचा उपशाखाप्रमुख असल्याची माहिती असून तक्रारदार शंकर गुप्ता हे आरटीओचे एजंट तसेच आरपीआयचे पदाधिकारी आहेत. गुप्ता हे कुरारच्या दुर्गानगरमध्ये राहतात. गुप्ता यांनी डोमिसाईल सर्टिफिकेट बनवून घेण्यास नकार दिल्याच्या रागात गुरुवारी रात्री साडेबाराच्या सुमारास परब तेथे आला आणि त्याने गुप्ता यांना बळजबरीने कारमध्ये बसवून सांताक्रुझला नेले. तिथे त्यांना चौघांनी मारहाण केली आणि नंतर पुन्हा कुरारमध्ये आणून सोडले. त्यानुसार त्यांनी याप्रकरणी कुरार पोलिसांना तक्रार केली. पोलिसांनी परब आणि त्याचा साथीदार दळवीला अटक केली. तर त्यांच्या अन्य दोन साथीदारांचा शोध सुरू असल्याचे कुरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश बेले यांनी सांगितले.

गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार उपशाखाप्रमुख परब जे डोमिसाईल बनवून द्यायचा ते बोगस असल्याचे त्यांना समजले होते. त्यामुळे त्यांनी त्याच्याकडून सदर सर्टिफिकेट बनवून घेण्यास नकार दिला. ज्याचा परबला राग आला होता. याप्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहेत.