मुंबई : अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान हा क्रुझ पार्टीत स्वत: गेला नव्हता. त्याला बोलवण्यात आले होते. मोहित कंबोज यांचे मेहुणे ऋषभ सचदेव आणि प्रतीक गाभा यांनी त्याला बोलावले होते. खंडणीखोरीसाठीच हा खेळ मांडण्यात आला होता. त्यामुळे हा अपहरणाचा प्रकार असून याचा सूत्रधार मोहित कंबोजच आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी रविवारी केला.
क्रुझ पार्टीवरील एनसीबीच्या छापेमारीनंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. नवाब मलिक हे सातत्याने पत्रकार परिषदा घेत समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधतानाच या प्रकरणातील नवनवीन माहिती उघड करत आहेत. दिवाळीनंतर धमाका करणार असल्याचा इशारा मलिक यांनी केला होता. त्यानुसार आज माध्यमांशी संवाद साधताना मलिक यांनी ड्रग्ज पार्टीप्रकरणी नवीन आरोप केले. या क्रुझवरील पार्टीत महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री अस्लम शेख यांना बोलावण्यात आले होते.
अस्लम शेख यांनी पार्टीला यावे यासाठी काशिफ खान याने बरेच प्रयत्न केले. मंत्री आणि राजकारण्यांच्या मुलांना या पार्टीला येण्यासाठी ट्रॅप केले जात होते. या पार्टीला पालकमंत्री अस्लम शेख आणि राजकारण्यांची मुले गेली असती तर उडता पंजाब नंतर उडता महाराष्ट्र करण्याचा गेम होता, असा दावा नवाब मलिक यांनी केला. अस्लम शेख यांना पार्टीत घेऊन जाण्याचा प्रयत्न का झाला, मंत्र्यांच्या मुलांना अडकविण्याचे प्रयत्न होते, सरकारच ड्रग्जचा खेळ चालवत आहे, अशी बदनामी करण्यासाठी कट रचला गेला होता का, असे प्रश्न नवाब मलिक यांनी उपस्थित केले. या सर्व प्रश्नांची उत्तरे राज्य सरकारच्या विशेष तपास पथकाने शोधायला हवीत, त्याची चौकशी व्हायला हवी. हे मोठे प्रकरण असून त्याच्या मुळाशी जाणार असल्याचे मलिक म्हणाले.
समीर वानखेडे आणि त्यांच्या तीन सहकाऱ्यांनी ड्रग्जच्या नावाखाली हजारो कोटींची वसुली चालविली आहे. माझी ही लढाई वानखेडे आणि त्यांच्या चांडाळ चौकडीविरोधात आहे. भाजप किंवा कोणत्या राजकारण्याविरोधात हा लढा नाही. कोणत्याही नेत्यावर आम्ही आरोप करत नाही. राज्य सरकार आणि केंद्र सरकारमधील ही लढाई नाही. तर एनसीबीत जी चांडाळ चौकडी बसली आहे त्यांना उघडे पाडत आहे. या चांडाळ चौकडीला बाहेर ठेवा आणि डिपार्टमेंटची बदनामी थांबवा, अशी आमची एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती आहे. या चौकडीची चौकशी करून प्रकरण धसास लावावे, असे आवाहनही मलिक यांनी यावेळी केले.
मलिक एक महिना झोपा काढत होते का? - कंबोज
आर्यन खान प्रकरणात माझ्यावर मास्टरमाइंड असल्याचा आरोप करणारे नवाब मलिक एक महिना झोपले होते का, असा पलटवार भाजपचे मोहित कंबोज यांनी केला आहे. सुनील पाटील याच्याशी बोलणे झाल्याचे रविवारी मलिक यांनी मान्य केले आहे. यापुढे आणखी अनेक गोष्टी समोर येतील. पाटील आणि मलिक यांची मैत्री आजची नसून वीस वर्षांपासूनची आहे, असा दावा कंबोज यांनी केला.