हनी ट्रॅप वापरून मित्राच्या मारेकऱ्याचे अपहरण
आरे पाेलिसांकडून पाच जणांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : इन्स्टाग्रामवर मैत्री करून हनी ट्रॅपचा वापर करून मित्राच्या मारेकऱ्याचे अपहरण करण्यात आले. मात्र वेळीच एका अनोळखी कॉलरने याची माहिती आरे पोलिसांना दिली आणि त्यांनी हत्येचा डाव उधळून लावत पाच जणांना अटक केली.
मोहम्मद शेख, ओवैस शेख, अमीन सय्यद, निहाल खान आणि सत्यम पांडे अशी अटक आरोपींची नावे आहेत. मोहम्मद सिद्दिक ऊर्फ मेंटल (२०) याच्यावर अल्ताफ नामक तरुणाच्या हत्येचा आरोप आहे. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी सिद्दिक याच्याव्यतिरिक्त सर्व आरोपींना अटक केली होती. तो पसार होता. त्यामुळेच अल्ताफचे मित्र असलेल्या पाचही आरोपींनी त्याचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार एका तरुणीच्या मदतीने इन्स्टाग्रामवरून त्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवून मुंबईला आरे परिसरात भेटायला बोलावले.
तेथे आलेल्या सिद्दिकला एका रुग्णवाहिकेत भरून नंतर कांदिवली पश्चिमेत उभ्या असलेल्या कारमध्ये डांबून हत्या करण्याच्या उद्देशाने ते नेत होते. मात्र वेळीच याची माहिती अनोळखी कॉलरने आरे पोलिसांना दिली. परिमंडळ १२ चे पोलीस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी व वरिष्ठ पोलीस निरीक्षक नूतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने सिद्दिकची सुटका करून पाचही आराेपींना अटक केली.
..........................
संशय येऊ नये म्हणून...
सिद्दिकचे अपहरण करण्यासाठी रुग्णवाहिका मागताना त्याच्या मालकाला संशय येऊ नये म्हणून आरोपींनी पिकनिकला निघाल्याप्रमाणे सोबत बिर्याणी आणि अन्य खाद्यपदार्थही घेतले होते. त्यामुळे इतक्या मोठ्या डावाबाबत कोणालाही किंचितही संशय आला नाही. सीसी फुटेजवरून रुग्णवाहिकेच्या मालकापर्यंत पोलीस पोहोचले.