लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दिवसेंदिवस खून, बलात्कार, विनयभंग आणि अपहरणांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. नुकतेच एका आयएएस शिकणाऱ्या मुलीला मॉडेल बनवण्याचे आमिष दाखवत तिचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणीला मेसेंजर चॅटवर संपर्क करत हैदराबादला बोलावून तिचे अपहरण करण्यात आले. मात्र, परिमंडळ-१२ने अवघ्या दहा तासात हा प्रकार उघडकीस आणत मुलीची सुखरूप सुटका केली.
अपहरण करण्यात आलेली तरुणी ही कांदिवली पूर्वेच्या ठाकूर व्हिलेज परिसरात राहते. अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण पडवळ यांना १० सप्टेंबर रोजी एका उच्छभ्रू घरातील तरुणीच्या अपहरणाची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी परिमंडळ १२चे पोलीस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांच्या साहाय्याने समतानगर पोलिसांच्या तीन पथकांची नियुक्ती करत मुलीचा शोध सुरू केला. त्यानुसार त्यांनी सीसीटीव्ही फुटेज पडताळले ज्यात मुलगी कुर्ला परिसरातून हैदराबादला जाणारी ट्रेन पकडताना दिसली. त्यानंतर एक पथक हैदराबादला दाखल झाले, तर दुसरे मोबाइल लोकेशनवर तिचा पत्ता शोधू लागले. त्यानुसार तिची ग्रीन स्पाइस हॉटेलमधून सुखरूप सुटका करण्यात आली. उत्तर प्रदेशच्या अलिगढमध्ये एका मुलासोबत ती चॅट करत असल्याचे उघड झाले असून, त्याचा पोलीस शोध घेत आहेत.