गुन्हेविषयक मालिका पाहून रचला अपहरणाचा कट
By admin | Published: December 27, 2016 03:39 AM2016-12-27T03:39:14+5:302016-12-27T03:39:14+5:30
नागपाडा येथून खंडणीसाठी अपहरण केलेल्या जुनेरा खान या साडेतीन वर्षांच्या चिमुरडीच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या आरोपींनी हा कट गुन्हेविषयक मालिका पाहून रचल्याचे
मुंबई : नागपाडा येथून खंडणीसाठी अपहरण केलेल्या जुनेरा खान या साडेतीन वर्षांच्या चिमुरडीच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या आरोपींनी हा कट गुन्हेविषयक मालिका पाहून रचल्याचे चौकशीत समोर आले आहे. चिमुरडीपाठोपाठ तिच्या दोन बहिणीही आरोपींच्या टार्गेटवर होत्या, असे पोलीस चौकशीत आढळले.
नागपाडा येथील महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या या आरोपींना अमलीपदार्थांचे व्यसन होते. यातील मुख्य सूत्रधार असलेला आरोपी जावेद (नाव बदललेले आहे) हाजी कासम चाळ परिसरात राहणाऱ्या बळीत मुलगी खान हिच्या शेजारीच राहतो. जुनेराचे वडील अनेकदा नातेवाइकांना फिरविण्यास भाड्याने कार घेऊन येत होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी १२ लाखांची नवीन कार घेतली. त्यांची कार पाहून जावेदची नियत फिरली. त्याला गुन्हेविषयक मालिका पाहण्याची आवड होती. यातूनच त्याने मुलीचे अपहरण करून खंडणी उकळण्याचा डाव आखला.
ठरल्याप्रमाणे ५ डिसेंबर रोजी घराबाहेर खेळत असलेल्या जुनेराला क्लोरोफॉर्म देत त्यांनी तिचे अपहरण केले. मात्र क्लोरोफॉर्मचे प्रमाण जास्त झाल्याने तिच्या नाकातून रक्त आले. त्याच रात्री जावेदचे कुटुंबीय लग्नाला गेले होते. घरात कोणीही नसल्याची संधी साधून त्याने तिला घरी आणले. मात्र तिची प्रकृती ढासळत असल्याने मोबाइल चार्जरने गळा आवळून तिची हत्या केली. त्यानंतर तिला एका बॅगेत भरताना तिच्यावर आणखी वार केले आणि ती बॅग इमारतीच्या पाण्याच्या टाकीत फेकली. काही दिवसांनी प्रकरण शांत झाल्याचे लक्षात घेत जावेदने पैसे उकळण्याचे ठरविले. त्यानुसार १९ तारखेला खान कुटुंबीयांकडे १ कोटी रुपयांची खंडणी मागितली. अखेर २८ लाखांत सौदा ठरला. पैसे घेऊन आरोपीने तिच्या वडिलांना कळवा, मुंब्रा, विक्रोळी परिसरात फिरवले. मात्र पोलीस मागावर असल्याचे समजताच आरोपींनी पळ काढला. आरोपींनी केलेल्या कॉलवरून पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला. शिवाय चौकशीत २० दिवसांनंतर आरोपीपैकी एक तरुण पोलिसांच्या हाती लागला. त्याला पोलीस खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. (प्रतिनिधी)
वर्षभरापासून सुरू होते प्लानिंग ?
जुनेरा खानच्या शेजारी राहत असलेला आरोपी गेल्या वर्षभरापासून जुनेराच्या अपहरणासाठी तयारी करत असल्याचे तपासात समोर येत आहे. तसेच जुनेरानंतर तिच्या अन्य दोन बहिणींनाही टार्गेट करण्याचा त्याचा विचार होता.