नवी मुंबई : एपीएमसी येथील अपहरण प्रकरणातील मुख्य सूत्रधार हा मनसेचा पदाधिकारी असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या टोळीने यापूर्वीही तिघांचे अपहरण करून खंडणी उकळली असल्याचेही तपासात समोर आले आहे. त्यापैकी एका गुन्ह्यात तिघांना अटक देखील झालेली होती.मेहंदी खान या तरुणाचे अपहरण करून त्याच्याकडून ८७ हजार रुपये उकळल्याचा गुन्हा एपीएमसी पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी नासीर सयद (२८), रेश्मा शेख (२५) आणि गौरी घोष (५०) यांना अटक केली. नासीर व गौरी हे दोघेही मनसे जनहित कक्षाचे पदाधिकारी आहेत, तर रेश्मा ही जुहूगाव येथील मनसे जनहित कक्षाच्या कार्यालयातील कर्मचारी आहे. रेश्मा हिचा वापर करून मेहंदी यांना बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती या टोळीने दाखवली होती. त्यानुसार मेहंदी यांचे अपहरण करुन त्यांना जनहित कक्षाच्या कार्यालयात डांबून ठेवण्यात आले होते. यावेळी त्यांना मारहाण करून त्यांच्याकडून विविध प्रकारे ८७ हजार रुपये उकळले होते. मात्र गुन्हा दाखल होताच पोलीस उपआयुक्त शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली या तिघांना अटक करण्यात आली होती.या अपहरण प्रकरणात मनसे जनहित कक्षाचा नवी मुंबई अध्यक्ष शाहनवाज खान, इम्रान अन्सारी आणि मोईम डिसोजा यांचाही सहभाग असल्याचे उघड झाले आहे. मेहंदी यांच्या अपहरणासाठी खान याचीच गाडी वापरण्यात आली होती. त्यामुळे या प्रकरणाचा सूत्रधार खान याच्यासह इम्रान व मोईम यांचाही शोध सुरु असल्याचे गुन्हे शाखा पोलीस उपआयुक्त मेंगडे यांनी सांगितले. एपीएमसी पोलिसांनी अटक केलेल्या तिघांना यापूर्वी खांदेश्वर पोलिसांनी अटक केली होती. त्यांनी अवधेशकुमार घोष यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांचा बेत फसल्याने ते पोलिसांच्या तावडीत सापडले होते. या टोळीने अशाच प्रकारे अनेकांचे अपहरण करुन पैसे उकळले असल्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने तपास सुरु असल्याचे उपआयुक्त मेंगडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
मनसे पदाधिका-याची नवी मुंबईत अपहरणाची टोळी
By admin | Published: September 23, 2014 2:04 AM