अपहरण करून लुटणाऱ्या दुकलीला अटक; दोन पिस्तूलविक्रे तेही ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 02:03 AM2020-02-08T02:03:13+5:302020-02-08T02:21:33+5:30
कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिसांची कारवाई
कल्याण : धक्का लागून मोबाइल फुटल्याच्या बहाण्याने अपहरण करून लुटणाऱ्या टोळीतील दोघांना कल्याण परिमंडळ-३ च्या दरोडाविरोधी पथकाने जेरबंद केले आहे. दुसºया घटनेत महात्मा फुले चौक पोलिसांनी पिस्तूलविक्रीसाठी आलेल्या दुकलीला अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
कल्याणमध्ये २२ जानेवारीला दिवसाढवळ्या एका व्यक्तीचे अपहरण करून लुटल्याची घटना घडली होती. महात्मा फुले चौक पोलिसांबरोबर दरोडा प्रतिबंधक पथकाने केलेल्या समांतर तपासात या गुन्ह्यातील राजीव ऊर्फ राजू मदनपाल ढिल्लोर आणि गुरू ऊर्फ भुºया शिवाजी परदबादे या २५ ते २७ वर्षे वयोगटांतील आरोपींना शिताफीने अटक केली.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्यांचा शोध घेऊन गुन्हा करताना वापर केलेली रिक्षाही पोलिसांनी जप्त केली. त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे. दरोडाविरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अविनाश पाळदे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कामगिरी केली.
दोन लाखांचा ऐवज जप्त
दोन जण पिस्तूलविक्रीसाठी येणार असल्याची माहिती महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे आणि पोलीस शिपाई दीपक सानप यांना मिळाली. त्यानुसार, त्यांनी सोमवारी मुरबाड रोडवरील प्रशांत हॉटेलसमोर सापळा लावून शाहरूख सय्यद आणि आकाश शिंदे यांना अटक केली. त्यांच्याकडे दोन पिस्तूल व चार मोबाइल आढळले.
गावठी पिस्तुलांची किंमत एक लाख ८० हजार असून चार मोबाइल, असा एकूण दोन लाख १० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. आरोपी २२-२३ वयोगटांतील असून यातील शाहरूखविरोधात ठाणेनगर आणि खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत, तर आकाशविरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस उपायुक्त पानसरे यांनी दिली.