हिरे व्यापा-याच्या मुलाची अपहरण करून हत्या, विघ्नेश संघवीला जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 03:20 AM2017-10-13T03:20:03+5:302017-10-13T03:20:51+5:30
आयपीएल सामन्यांदरम्यान लावलेल्या सट्ट्यामध्ये झालेले नुकसान भरून काढण्यासाठी हिरे व्यापाºयाच्या अल्पवयीन मुलाचे अपहरण व हत्या केल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने विघ्नेश संघवीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
मुंबई : आयपीएल सामन्यांदरम्यान लावलेल्या सट्ट्यामध्ये झालेले नुकसान भरून काढण्यासाठी हिरे व्यापाºयाच्या अल्पवयीन मुलाचे अपहरण व हत्या केल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने विघ्नेश संघवीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. संघवी आधी १४ वर्षांची शिक्षा पूर्ण करेल त्यानंतरच त्याची जन्मठेपेची शिक्षा सुरू होईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
विशेष सरकारी वकील कल्पना चव्हाण यांनी विघ्नेश संघवी याला फाशीची शिक्षा ठोठावण्यात यावी, अशी विनंती न्यायालयाला केली. मात्र न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा ठोठावण्यास नकार दिला. या केसमध्ये हत्या करण्यात आलेला आदित रंका याचा चुलत भाऊ हिमांशू रंका यालाही पोलिसांनी अटक
केली होती. मात्र संशयाचा फायदा देत न्यायालयाने त्याची सुटका
केली.
संघवी याला फाशीची शिक्षा ठोठावली नसली तरी गुन्ह्याचे गांभीर्य व स्वरूप लक्षात घेत संघवीने ३० वर्षांची शिक्षा पूर्ण केल्याशिवाय त्याला न सोडण्याचे निर्देश न्यायालयाने कारागृह प्रशासनाला दिले आहेत. त्याच्या शिक्षेवर स्पष्टीकरण देताना न्यायालयाने म्हटले की, दोन कलमांतर्गत त्याला प्रत्येकी सात वर्षांची शिक्षा देण्यात आली आहे.
या दोन्ही शिक्षा एकत्र न भोगता एकापाठोपाठ भोगाव्या लागतील. त्या पूर्ण केल्यावरच त्याच्या जन्मठेपेच्या शिक्षेची सुरुवात होईल. तसेच न्यायालयाने संघवीला नऊ लाख रुपयांचा दंडही ठोठावला. दंडाची रक्कम आदितच्या आईला देण्याचे निर्देश दिले.
आयपीएल सामन्यांदरम्यान लावलेल्या सट्ट्यासाठी त्याने कर्ज काढले होते. मोठ्या प्रमाणावर काढलेले हे कर्ज फडण्यासाठी विघ्नेश संघवी याने आदितचे अपहरण केले व त्यानंतर त्याची हत्या केली. या हत्येचा उलगडा झाल्यानंतर पोलिसांनी विघ्नेशला ताब्यात घेतले. त्याच्यावर भारतीय दंडसंहिता कलम ३८७ व २०१ अंतर्गत गुन्हा नोंदविला.