मुंबई : उधारी परत न केल्याने सीबीआयचे अधिकारी असल्याचे भासवून दहा लाखांच्या खंडणीसाठी एका तरुणाचे अपहरण करणाऱ्या चौघांना भायखळा पोलिसांनी शिताफीने अटक केली. मोहतलाह कुरेशी, बिलाल मालिम, अनुप रामसहाय सिंह व मस्तान शेख अशी त्यांची नावे आहेत. त्यांनी झुजेर संगोठवाला (१९) याचे रविवारी अपहरण केले होते. या कटाचा मुख्य सूत्रधार त्याचा मित्र कुरेशी असल्याचे पोलिसांनी सांगितले. झुजेरचे वडील मोठे व्यावसायिक आहेत. त्याने मित्र मोहतलाह कुरेशीकडून काही पैसे उसने घेतले होते. तो ते परत करत नसल्याने दोघांमध्ये वाद झाला होता. त्यामुळे झुजेरचे अपहरण करून त्याच्या वडिलांकडून आपले पैसे वसूल करावे, असा कट कुरेशीने रचला. रविवारी सायंकाळी माझगाव येथील परब चौकात झुजेरला फिरण्यासाठी सोबत नेले. हॉटस्पॉट दुकानाजवळ स्कोडा गाडीत थांबले असताना तिघे जण तिथे आले. त्यांच्यापैकी अनुपसिंह याने आपण सीबीआय अधिकारी असल्याचे सांगत त्याच्या गाडीत बसले. सोने विक्री व अमली पदार्थाची विक्री करीत असल्याच्या आरोपावरून अटक करण्याची धमकी देऊन झुजेरला ताब्यात घेऊन निर्जन ठिकाणी नेले. या वेळी कुरेशीने तिघाशी मध्यस्थी करण्याचे नाटक करीत दहा लाख रुपये दिल्यास सुटका करण्यास तयार असल्याचे झुजेरला सांगितले. मात्र त्याच्याकडे इतकी रक्कम नसल्याने आरोपींनी त्याच्यासह स्कोडा आपल्याकडे ठेवून घेतली. झुजेरने हा प्रकार वडिलांना कळविल्यानंतर त्यांनी तत्काळ भायखळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी एक पथक तयार केले. सापळा रचत आरोपींना १० लाख रुपये घेण्यासाठी भायखळा परिसरात बोलावले. नियोजनाप्रमाणे मंगळवारी सायंकाळी ते पैसे घेण्यासाठी आले असताना पोलिसांनी त्यांना अटक केली. (प्रतिनिधी)
मित्रानेच रचला अपहरणाचा कट
By admin | Published: May 26, 2016 3:23 AM