किडनी ट्रान्सप्लान्टच्या नावाने डॉक्टरलाच गंडा

By admin | Published: February 9, 2016 02:40 AM2016-02-09T02:40:45+5:302016-02-09T02:40:45+5:30

येथील प्रसिद्ध डॉक्टरांच्या वडिलांची दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाल्याने किडनी ट्रान्सप्लान्टसाठी (मूत्रपिंड प्रत्यारोपण) त्यांनी एका रॅकेटची मदत घेतली. या टोळीने २० लाखांचा सौदा करून

Kidney transplant is the doctor's name | किडनी ट्रान्सप्लान्टच्या नावाने डॉक्टरलाच गंडा

किडनी ट्रान्सप्लान्टच्या नावाने डॉक्टरलाच गंडा

Next

बदलापूर : येथील प्रसिद्ध डॉक्टरांच्या वडिलांची दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाल्याने किडनी ट्रान्सप्लान्टसाठी (मूत्रपिंड प्रत्यारोपण) त्यांनी एका रॅकेटची मदत घेतली. या टोळीने २० लाखांचा सौदा करून संबंधित डॉक्टरकडून पाच लाख रुपये उकळले आहेत. एकंदर व्यवहार बेकायदा असल्याचे लक्षात येताच डॉक्टरांनी गुन्हा दाखल करताच टोळीतील दोघांना उल्हासनगरच्या गुन्हे अन्वेषण विभागाने दिल्लीतून अटक केली. स्वत: डॉक्टर असताना चुकीच्या पद्धतीने किडनी ट्रान्सप्लान्टची तयारी या डॉक्टरांनी कशी केली, हादेखील चर्चेचा विषय बनला आहे.
बदलापूरच्या भगवती रुग्णालयाचे डॉक्टर कृष्णा निमसाखरे यांचे वडील भास्कर यांना काही वर्षांपासून मूत्रपिंडाचा विकार होता. त्यात दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाल्याने त्यांच्यापुढे प्रत्यारोपण करण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहिला नव्हता. वडिलांचा जीव वाचवण्यासाठी निमसाखरे यांनी इंटरनेटवरून माहिती मिळवत कोणी मूत्रपिंड देऊ शकेल का, याचा शोध घेतला. तेव्हा, त्यांना ‘आय नीड किडनी’ या साइटवर किडनी ट्रान्सप्लान्टबाबत माहिती मिळाली. दिल्लीतील टोळीने चलाखीने डॉक्टरांना विश्वासात घेतले. एवढेच नव्हे, तर त्यांनी पूर्ण कायदेशीर मार्गाने किडनी ट्रान्सप्लान्ट करून देण्याचे आश्वासन दिले. टोळीतील सदस्यांवर विश्वास ठेवत डॉक्टरांनीही होकार दिला. नंतर, शस्त्रक्रियेसाठी २० लाखांचा सौदा ठरला. त्यालाही डॉक्टरांनी होकार दिला. एवढेच नव्हे तर पाच लाखांची अनामत रक्कमही दिली. किडनी मॅच होण्यासंदर्भात डॉक्टरांच्या वडिलांच्या आवश्यक चाचण्याही झाल्या, पण या टोळीच्या आर्थिक व्यवहारांबाबत आणि कागदपत्रांमधील फेरफारावरून डॉक्टरांना संशय आला. ही प्रक्रिया बेकायदा असल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी बदलापूर पोलीस ठाण्यात संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला. प्रकरण गंभीर असल्याने हा तपास लागलीच उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग केला. पोलिसांनी सूत्रे हलवत दिल्लीतून नेहा मेहरा (३३) आणि कॅफ खान (२७) यांना अटक केली.

या टोळीची सदस्य असलेल्या करिश्मा नावाच्या महिलेचा पोलीस शोध घेत आहेत. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना १० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली. यासंदर्भात तपशिलासाठी डॉक्टर निमसाखरे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

या प्रकरणातील आरोपींना अटक झालेली असली तरी या टोळीने देशभरातील आणखी किती जणांना अशा प्रकारे गंडा घातला आहे, याचा पोलीस शोध घेत आहेत.
या टोळीचा मुख्य सूत्रधार कोण आहे आणि त्याला आणखी किती जण मदत करत आहेत, याचाही शोध सुरू आहे.
किडनी प्रत्यारोपणाच्या नावाने केवळ फसवणूक करीत आहेत की, खरोखरच बेकायदा रोपणाचे काम करीत आहेत, असा नवा मुद्दा समोर आला आहे.
किडनी ट्रान्सप्लान्टचे सर्व नियम सर्वसामान्यत: डॉक्टरांना माहीत असतात. असे असतानाही चुकीच्या पद्धतीने एखाद्या टोळीच्या सापळ्यात डॉक्टर निमसाखरे कसे सापडले, हादेखील तपासाचा भाग ठरणार आहे.

Web Title: Kidney transplant is the doctor's name

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.