मुंबई : किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेमध्ये रक्तगट जुळणे हे अत्यंत गरजेचे असते, त्याशिवाय प्रत्यारोपण कठीण बनते. रक्तगट जुळत नसताना तसेच दात्याच्या पेशी रुग्णाशी जुळत नसल्याने रखडलेली किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. देशातील ही दुर्मीळ शस्त्रक्रिया मानली जात असून यात रोबोचीही साथ डॉक्टरांना मिळाली. सर एच. एन. रिलायन्स हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने हे यश मिळविले आहे.ठाण्यातील महिला डॉ. राजश्री राठी (५०) आणि रत्नागिरीचे सद्दाम म्हसकर (३२) हे दोन्ही रुग्ण किडनीविकाराशी निकराची झुंज देत होते. गेल्या चार वर्षांपासून दोन्ही रुग्ण डायलिसिसवर विसंबून होते. दर आठवड्याला सुमारे १२ हजारांचा खर्च डायलिसिससाठी त्यांना करावा लागत होता. राजश्री यांनी दोन वर्षांपूर्वी किडनी प्रत्यारोपणासाठी अर्ज केलेला होता. त्यांचे नाव प्रतीक्षा यादीवर होते. तर रत्नागिरीचे असलेले सद्दाम म्हसकर यांची आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने त्यांना हे उपचार घेणे कठीण बनले होते. गेल्या सहा महिन्यांपासून मुंबईत राहण्याचा खर्च त्यांना करावा लागत होता.राजश्री यांच्या पतीचा रक्तगट जुळत असूनही ते राजश्री यांना किडनी देऊ शकत नव्हते. राजश्री यांच्या शरीरातील ह्युमन ल्युकोसाईट अॅन्टीजीन (एचएलए) हा घटक अधिक प्रमाणात असल्याने शस्त्रक्रियेत अडचण होती. एचएलए अधिक असल्यास रक्तातील घटक ‘फॉरेन बॉडी’ ओळखतात. त्यामुळे किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करूनही त्याची यशस्वीता फार काळ टिकत नाही. एचएलए हा घटक शरीरातील पेशी जुळवून घेण्यासंदर्भात अत्यंत महत्त्वाचा ठरतो. असे रुग्ण शंभरात ५ असतात. त्यामुळे त्यांना किडनी प्रत्यारोपणासाठी एचएलए जुळणारा दाता मिळण्यासाठी वाट पाहावी लागते. रत्नागिरीतील सद्दाम म्हसकर यांना त्यांच्या आई खातिजा किडनी देण्यास तयार होत्या, तथापि सद्दाम यांच्याशी त्यांचा रक्तगट जुळत नसल्याने किडनी प्रत्यारोपण होऊ शकत नव्हते. अवयवदानासाठी त्यांनी नोंदणी करूनही योग्य दाता मिळण्यासाठी अजून एक वर्षाचा कालावधी लागेल, असे त्यांना सांगण्यात आल्याने आम्ही हताश झालो होतो, असे सद्दाम यांच्या पत्नी उमैरा यांनी सांगितले. या दोन्ही केसेस सर एच. एन. रिलायन्स हॉस्पिटलच्या किडनीविकार तज्ज्ञ डॉ. श्रृती तापियावाला यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी खातिजा आणि राजश्री यांचा रक्तगट तपासला. तो वेगळा असला तरी एचएलए टेस्ट दोघांच्या जुळल्या. किडनी नाकारण्याची शक्यता अत्यंत दुर्मीळ असल्याने त्यांच्या प्रत्यारोपणाचा निर्णय त्यांनी घेतला. शिवाय सद्दाम यांच्याशी राजश्री यांचे पती शांतीलाला यांचा रक्तगट जुळल्याने मार्ग मोकळा झाला. रक्तगट एकच असल्याने प्लाझ्मा जुळणीसाठी लागणारा सुमारे दोन ते अडीच लाखांचा खर्चही सद्दाम यांचा वाचला.विदेशातील तंत्र भारतात प्रथमचया शस्त्रक्रियेसंदर्भात किडनीविकारतज्ज्ञ डॉ. श्रृती तापियावाला यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, परदेशात अशा शस्त्रक्रिया अलीकडे होऊ लागल्या आहेत. पण भारतात पेशी जुळणीअभावी रखडलेल्या शस्त्रक्रिया व्हायला वेळ लागतो, त्या अनुषंगाने झालेली ही सुरुवात स्वागतार्ह अशीच म्हणावी लागेल.
पेशी जुळत नसल्याने रखडलेले किडनी प्रत्यारोपण यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 12:42 AM