लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाकाळात विद्यार्थी सर्वाधिक भरडला गेला. लॉकडाऊनमुळे एकीकडे शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली, तर दुसरीकडे त्रोटक सुविधांमुळे आभासी (ऑनलाइन) शिक्षणातही बऱ्याच समस्यांना तोंड द्यावे लागले. ‘केआयआयटी’ या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने मात्र कोरोनाकाळातही अत्याधुनिक सुविधांच्या माध्यमातून आपले शिक्षणव्रत अखंड सुरू ठेवले. लॉकडाऊनमुळे जगभरात बेरोजगारांचे प्रमाण वाढत असताना या संस्थेने मात्र आपल्या विद्यार्थ्यांना प्लेसमेंट सेवा देत देश-विदेशांत नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या.
कोरोनाकाळात आभासी शिक्षण सुविधा उपलब्ध करून देणारी ‘केआयआयटी’ ही पहिली संस्था ठरली. लॉकडाऊन लागू झाल्यानंतर अगदी पहिल्या दिवसापासून जगभरातील ५० देशांमधील सुमारे ३० हजार विद्यार्थ्यांना या संस्थेने ही सुविधा उपलब्ध करून दिली.
कोरोना संकटकाळातही विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ न देता या संस्थेने त्यांना आभासी पद्धतीने प्लेसमेंट सुविधा खुली करून दिली. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात ‘केआयआयटी’मधून उत्तीर्ण झालेले सुमारे ८० टक्के विद्यार्थी प्लेसमेंटसाठी पात्र ठरले. त्यापैकी २,५०० विद्यार्थ्यांना देश-विदेशांतील आघाडीच्या आस्थापनांमध्ये नोकरीची संधी मिळाली, तर १,६०० विद्यार्थ्यांना आघाडीच्या कंपन्यांकडून नोकरीसाठी विचारणा करण्यात आली आहे.
कोरोनाकाळात एकीकडे बेरोजगारांची संख्या वाढत असल्याने आपल्या पाल्याच्या भविष्याबाबत चिंतित झालेल्या पालकांना या निमित्ताने मोठा दिलासा मिळाला. या जागतिक संकटकाळातही सुमारे १० ते ३० लाख रुपये वार्षिक पगाराची नोकरी मिळाल्याने विद्यार्थ्यांसह पालकांतही आनंदाची भावना असल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले.
१९९२ साली प्रा. अच्युत सामंत यांनी या व्यावसायिक प्रशिक्षण संस्थेची स्थापना केली. अल्पावधीतच एक प्रथितयश संस्था म्हणून ‘केआयआयटी’ नावारूपास आली, अशी माहिती संस्थेतर्फे देण्यात आली.