मुंबई: मुंबई महानगरपालिच्या उद्यान खात्यामधील उद्यान विद्या सहाय्यक सीमा बापू माने यांनी २६ जानेवारी २०२४ रोजी आफ्रिका खंडामधील सर्वात उंच पर्वत माउंट किलीमांजारो सर करून तब्बल १९,३४१ फूट उंचीवर संविधानाची प्रस्तावना वाचली. भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून त्या संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुतेचा जगभर प्रसार करत आहेत. या मोहिमे आधी माने यांनी बेसिक आणि ऍडव्हान्स माउंटेनिअरींग कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे.
उद्यान अधिक्षक जितेंद्र परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सोलापूर मधील ३६० एक्सप्लोरर कंपनीमार्फत माने यांनी मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली असून भविष्यात माऊंट एव्हरेस्ट सहित उर्वरित पाचही खंडातील सर्वोच्च शिखरे पादाक्रांत करण्याचा त्यांचा निर्धार आहे. याआधी त्यांनी, हिमाचल प्रदेश मधील फ्रेंडशिप पीक, सिक्कीम मधील काब्रू डोम कॅम्प १ सर केले आहे. तसेच सह्याद्री मधील वजीर पिनॅकल, स्कॉटिश कडा, तैलाबैला, नवरा पिनॅकल, नवरी पिनॅकल, भैरवगड, हरिश्चंद्र गड, कळसूबाई, माहुली गड, व इतर अनेक गड सर केले आहेत. तसेच काश्मीर मधील अवघड तीन तलावांचा तारसार, मारसार आणि सुंदरसार लेक ट्रेक यशस्वीरीत्या पूर्ण केलेला आहे.