नवी मुंबई : तुर्भे गावात छताचे प्लास्टर कोसळल्यामुळे अक्षय अशोक शिंदे (17) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. यामुळे धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पुनर्विकासाचा प्रश्न कधी मार्गी लागणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
तुर्भे गाव सेक्टर 24 मध्ये शिवकृपा नावाची दोन मजली इमारत आहे. तळमजल्यावर दुकाने तर वरील दोन मजल्यावर निवासी सदनिका आहेत. दुस:या मजल्यावरील घरातील छताचे प्लास्टर सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास कोसळले. यामुळे अक्षय अशोक शिंदे (17) हा युवक गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ वाशीतील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. त्या ठिकाणी उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. या घटनेचे वृत्त समजताच विभाग अधिकारी भरत धांडे व इतर अधिका:यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. जुन्या इमारतीचे प्लास्टर कोसळून रहिवासी जखमी झाल्याच्या अनेक घटना शहरात घडल्या आहेत. परंतु अशा अपघातामध्ये रहिवाशाचा मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना आहे.
तुर्भेमधील अपघातामुळे जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरात मागील काही वर्षापासून सिडको व खाजगी विकासकाने बांधलेल्या जुन्या इमारती धोकादायक बनल्या आहेत. छताचे प्लास्टर कोसळण्याच्या घटना रोज घडत आहेत. यामध्ये अनेक जण किरकोळ जखमी झाले आहेत. नेरूळ, सीवूड व वाशीमध्ये हजारो नागरिक अपघाताच्या सावटाखाली जीवन जगत आहेत. या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न शासनाकडे प्रलंबित आहे. वाढीव चटईक्षेत्र, क्लस्टर डेव्हलपमेंटचा प्रश्न कधी मार्गी लागणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (प्रतिनिधी)
हजारो नागरिकांवर अपघाताचे सावट
सीवूड, नेरूळ पश्चिम व वाशीमध्ये सिडकोने बांधलेल्या अनेक इमारती धोकादायक बनल्या आहेत. काही इमारती महापालिकेने धोकादायक घोषित केल्या आहेत. त्या व्यतिरिक्तही अनेक इमारतींची स्थिती गंभीर आहे. कधीही इमारत कोसळून शेकडो नागरिकांना प्राणास मुकावे लागण्याची शक्यता आहे. शक्य तितक्या लवकर पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लागला नाही तर भविष्यात अनेक नागरिकांना जीव गमवावा लागणार आहे.