Join us

भिवंडीत इमारत कोसळून एक ठार

By admin | Published: December 30, 2015 1:12 AM

इदगाह रोड तकीया भागात आज पहाटे दुमजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका वृद्धाचा मृत्यू झाला असून, चार जण किरकोळ जखमी झाले.

भिवंडी : इदगाह रोड तकीया भागात आज पहाटे दुमजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका वृद्धाचा मृत्यू झाला असून, चार जण किरकोळ जखमी झाले.महानगरपालिकेच्या प्रभाग समिती क्र. ५ च्या कार्यक्षेत्रातील इदगाह रोड तकीया येथील घर क्र.६०८ ही इमारत ४५ वर्षे जुनी होती. महापालिकेने ती धोकादायक असल्याचे जाहीर केले होते. इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याची नोटीस महापालिका प्रशासनाने बजावूनही काही रहिवासी येथे वास्तव्य करीत होते. ते या अपघातात सापडले. घटनेचे वृत्त समजताच आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी रवाना झाले. इमारतीच्या तळमजल्यावर खोदकाम सुरू असल्याने, इमारत कोसळल्याची माहिती परिसरांतील काही नागरिकांनी दिली. इमारत कोसळण्याचा आवाज येताच आजूबाजूच्या रहिवाशांनीही मदतीकरिता धाव घेतली. कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली चार जण अडकून पडले होते. आपत्ती व्यवस्थापनप्रमुख नामदेव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन दलाच्या जवानांनी शाहीन असद बेग (५५), अली अजगर असद बेग (२४), इशरत अन्वर बेग (३७) व मुशरफ अन्वर बेग (१५) यांना बाहेर काढले. त्यांना किरकोळ जखमा झाल्याने उपचारासाठी इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळी पालिका आयुक्त बालाजी खतगावकर जातीने उभे होते. बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर या परिसरात नागरिकांनी बघ्यांनी गर्दी केली होती. (प्रतिनिधी)