शेजा-याला अद्दल घडविण्यासाठी केली मांजरीची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 02:30 AM2018-06-30T02:30:37+5:302018-06-30T02:30:42+5:30
महिनाभराने गुन्हा दाखल, डोंगरीतील प्रकार
मुंबई : शेजा-याला अद्दल घडविण्यासाठी त्याच्या मांजरीची हत्या करून, तिचा मृतदेह कचराकुंडीत फेकल्याचा धक्कादायक प्रकार डोंगरीत उघडकीस आला. या प्रकरणी महिनाभराने डोंगरी पोलिसांनी विकृत शेजाºयाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भेंडीबाजार परिसरात व्यावसायिक शकील अहमद शेख (४९) हे कुटुंबीयांसोबत राहतात. त्यांना मांजर पाळण्याची आवड आहे. २०१६ मध्ये त्यांनी इमारतीच्या आवारात बेवारस फिरणारी मांजर घरी आणली. आॅगस्ट २०१६ मध्ये त्या मांजरीने पिल्लाला जन्म दिला. तेव्हापासून ते दोघांचाही सांभाळ करत होते.
त्यांनी केलेल्या तक्रारीनुसार, दुमजली इमारतीत राहणारे शेजारी अयुब घाची (४०) हे त्यांचा राग करतात. शेख यांना त्रास देण्यासाठी ते त्यांच्या मांजरींना टार्गेट करू लागले. सप्टेंबर २०१७ मध्ये त्याने मांजरीच्या पिल्लाला मारहाण केली. या प्रकरणी शेख यांनी डोंगरी पोलिसांत तक्रार दिली होती. ते मांजरीला नेहमी सकाळी ७ ते ८ फिरण्यासाठी घराबाहेर सोडत असत. त्यानंतर, ११च्या सुमारास मांजर पुन्हा तेथे येऊन थांबत होती. २७ मे रोजी सकाळी ७ ते ८ दरम्यान त्यांनी मांजरीला घराबाहेर सोडले. मात्र, ११ वाजता दरवाजा उघडला, तेव्हा मांजर तेथे नव्हती. त्यांनी मांजरीचा शोध सुरू केला. मात्र, ती सापडलीच नाही.
यापूर्वी आयुबने त्यांच्या मांजरीच्या पिल्लाला गोणीत भरून फेकून दिले होते. त्यामुळे त्यानेच मांजरीला गायब केल्याचा संशय त्यांना आला. त्यांनी चौकशी सुरू केली. तेव्हा हॉटेलमध्ये काम करणाºया जोमेस वर्गीस याने दुपारी ३च्या सुमारास त्यांच्या मांजरीला एका प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये भरून ती कचराकुंडीत फेकून दिल्याचे समजले. त्यांनी या प्रकरणी २७ मे रोजी डोंगरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तपासात वर्गीसने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने हा गुन्हा आयुबच्याच सांगण्यावरून केल्याचे सांगितले. या प्रकरणी अखेर महिनाभराने डोंगरी पोलिसांनी आयुबविरुद्ध मंगळवारी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती डोंगरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भागडीकर यांनी दिली.