खवल्यासाठी होते जगात तस्करी; २० फेब्रुवारी, जागतिक खवलेमांजर दिवस
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मांस, चिनी औषधे व बुलेटप्रुफ जॅकेटसाठी खवलेमांजराची जगात मोठ्या प्रमाणात हत्या तसेच खवल्यासाठी तस्करी होत आहे. या सर्व प्रकारामुळे खवलेमांजराची प्रजाती अत्यंत धोक्यात आली आहे, अशी माहिती सह्याद्री निसर्ग मित्रने दिली.
संपूर्ण अंगावर खवले असणारा खवलेमांजर हा एकमात्र प्राणी आहे. मोठ्या प्रमाणावर खवल्यासाठी होणारी त्यांची हत्या हा चिंतेचा विषय आहे. त्यामुळे त्यांची संख्या प्रचंड प्रमाणात कमी आहे. याचमुळे अत्यंत धोक्यात असलेल्या प्रजातीच्या यादीत हा प्राणी समाविष्ट करण्यात आला आहे. जगभरात खवले मांजराला वाचविण्यासाठी प्रयत्न होत आहेत.
सह्याद्री निसर्ग मित्र व वनविभाग यांच्यावतीने व पोलीस यांच्या सहकार्याने खवलेमांजर संरक्षण व संवर्धनाचे काम हाती घेण्य़ात आले आहे. खवलेमांजर कोकणात सर्वत्र आढळते. मानवाला निरुपद्रवी असा हा प्राणी असून, तो निशाचर आहे. त्याच्या तोंडात दात नसल्यामुळे तो मुंग्या व वाळवी खाऊन रहातो. खवलेमांजर अन्न खाण्यासाठी आपली लांब जीभ वापरतो.
खवलेमांजराची शिकार करणे कायद्याने गुन्हा असून, त्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद आहे. खवलेमांजराची सद्यस्थिती व त्याला असणारे धोके याबाबत वन विभाग तसेच सह्याद्री निसर्ग मित्र यांनी संयुक्त उपक्रम सुरू केला असून, त्याच्या सर्वेक्षणाचे, खवले मांजर संरक्षण व संवर्धनाचे काम हाती घेण्य़ात आल्याची माहिती सह्याद्री निसर्ग मित्रचे अध्यक्ष भाऊ काटदरे यांनी दिली.
* सर्वसामान्यांमध्ये जनजागृतीसाठी प्रयत्न
उपक्रमांतर्गत कोकणाची ओळख असणाऱ्या पारंपरिक दशावतारी कलेमार्फत पुराणातील खवलेमांजराची ओळख व निसर्गातील महत्त्वाचे स्थान आणि त्याच्या हत्येचे दुष्परिणाम तसेच त्याला कायद्याने मिळालेले संरक्षण याबाबत सर्वसामान्यांमध्ये जनजागृतीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
----------------------