Sanjay Raut मोदींनी शपथ घेतल्यापासून ४० जवानांच्या हत्या, मी हत्याच म्हणेन...; राऊतांनी शाह यांना धरले जबाबदार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 11:26 AM2024-07-17T11:26:08+5:302024-07-17T11:45:31+5:30
Sanjay Raut : तीच विटी आणि दांडू तेच. गृहमंत्री म्हणून ते आधी पाच वर्षे पूर्णपणे अपयशी ठरले, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून काही ठोस कार्य झालेच नाही. तेच अमित शहा, तेच मोदी, तेच रक्षा मंत्री. अतिरेक्यांनी धुमाकूळ घातला आहे. - संजय राऊत.
दहशतवाद्यांच्या हल्ल्यात भारतीय जवान शहीद झाल्याच्या घटनेवरून उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यावर टीकेचे आसूड ओढले आहेत. नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतल्यापासून आजपर्यंत किमान 40 जवानांच्या हत्या झाल्या आहेत. मी हत्या म्हणत आहे, बलिदान आहे, हुतात्मे आहेत सर्व मान्य आहे. पण त्या हत्या आहेत त्या हत्येला जबाबदार देशाचे गृहमंत्री अमित शाह, नरेंद्र मोदी असल्याची टीका राऊत यांनी केली आहे.
तीच विटी आणि दांडू तेच. गृहमंत्री म्हणून ते आधी पाच वर्षे पूर्णपणे अपयशी ठरले, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून काही ठोस कार्य झालेच नाही. तेच अमित शहा, तेच मोदी, तेच रक्षा मंत्री. अतिरेक्यांनी धुमाकूळ घातला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये अमित शाह हे देशाचे गृहमंत्री म्हणून फक्त हात जोडत बसलेले आहेत किंवा फक्त राजकारणामध्ये व्यस्त आहेत, अशी टीका राऊत यांनी केली.
अमित शाह देशातल्या निवडणुका, इतर उद्योग, खोके जमवणे, धमक्या देणे याच्यामध्ये व्यस्त आहेत. देशाचे दुश्मन मात्र मोकाट आहेत. अमित शाह आपल्या राजकीय विरोधकांना दुश्मन समजतात. त्यांनी आमच्या जवानांची हत्या करणाऱ्यांना देशाचे दुश्मन समजले पाहिजे होते. त्यांनी जेवढी ताकद आपल्या राजकीय विरोधकांना संपविण्यासाठी लावली ती ताकद जम्मू कश्मीरमध्ये, मणिपूरमध्ये, देशातल्या शत्रूंना खतम करण्यासाठी लावली असती तर जवानांच्या या हत्या पाहण्याची वेळ आमच्यावर आली नसती, असा आरोप राऊत यांनी शाह यांच्यावर केला आहे.
थोडी तरी लाज आणि नैतिकता असेल तर नरेंद्र मोदी यांनी अमित शहा यांचा गृहमंत्री पदाचा राजीनामा घ्यायला हवा. अत्यंत अपयशी असे गृहमंत्री आहेत. टोटल फेल्युअर होम मिनिस्टर इंडिया, अशी मागणी राऊत यांनी मोदींकडे केली आहे.