मुंबई : मुंबईकरांची लाइफलाइन असलेल्या लोकलमध्ये ११ जुलै २००६ रोजी झालेल्या रेल्वे बॉम्बस्फोटांच्या कटू आठवणींना सोमवारी १६ वर्ष पूर्ण होत आहे. आजही त्याच्या जखमा ताज्या आहेत. ११ मिनिटांमध्ये सात बॉम्बस्फोट झाले आणि त्यामध्ये २०९ निष्पाप मुंबईकरांचा बळी गेला आणि ७१४ जण जखमी झाले.
२००६ मध्ये पश्चिम उपनगरीय लोकलमध्ये पहिला बॉम्बस्फोट झाला. पुढे एका पाठोपाठ एक असे एकूण ७ बॉम्बस्फोट झाले आणि मुंबई हादरली. पश्चिम रेल्वेच्या खार रोड, जोगेश्वरी, माहिम, मीरा रोड, माटुंगा रोड, बोरीवली, वांद्रे या ठिकाणी ११ मिनिटांमध्ये सात बॉम्बस्फोट झाले. त्यात २०९ निष्पाप मुंबईकरांचा बळी गेला आणि ७१४ जण जखमी झाले. १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटांच्या मालिकेनंतर पुन्हा एकदा साखळी बॉम्बस्फोटांनी हादरली होती. याच बॉम्बस्फोटात जखमी झालेल्यांमध्ये आजही या कटू आठवणीच्या जखमा ताज्या आहेत.
१३ आरोपींमधून १२ जण दोषी याप्रकरणी, २०१५ रोजी न्यायालयाने १३ आरोपींमधून १२ जणांना दोषी ठरवले होते. यातील कमाल अहमद अन्सारी, मोहंमद फैजल शेख, एहत्तेशाम सिद्दिकी, नावेद हुसेन खान,असिफ खान या पाच आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली, तर तन्वीर अहमद अन्सारी, मोहंमद माजिद शफी, शेख आलम शेख, मोहंमद साजिद अन्सारी, मुझ्झमील शेख, सोहेल मेहमूद शेख, जमीर अहमद शेख या सात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.